नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गुजरातमधील वेगवेळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पण आजचं राहुल गांधींचं सोमनाथ दर्शन वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

कारण, मंदिराच्या रजिस्टरवर काँग्रेसचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यांनी यांनी राहुल गांधींचा उल्लेख बिगर हिंदू म्हणून केला आहे. त्यामुळे यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.



राहुल गांधींनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासोबत सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी मंदिराच्या सुरक्षा विभागाच्या रजिस्टरवर दोघांच्या नावाची एंट्री करणं अपेक्षित होतं. त्यानुसार, काँग्रेसचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागी यांनी दोघांच्या नावाची रजिस्टरमध्ये नोंद केली. पण यावेळी त्यांनी दोघांच्या नावाची नोंद करताना बिगर हिंदू असा उल्लेख केला. या राजिस्टरवर राहुल गांधींनी सही केली नसली, तरी त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

यावरुनच भाजपचे महासचिव अनिल जैन यांनी ट्वीट केलं आहे. जैन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “जर तुम्ही सोमनाथ मंदिरात जात असाल, आणि तुम्ही हिंदू धर्मीय नसाल, तर तुम्हाला एखा रजिस्टरवर याची नोंद करावी लागते. आज राहुल गांधींची याच रजिस्टरमध्ये नोंद झाली आहे. देशासोबत धर्मावरुन चेष्टा कशाला?”

तर दुसरीकडे काँग्रेसकडून या प्रकरणावरुन स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना गुजरात काँग्रेस प्रवक्ते मनीष दोषी यांनी एबीपी माझाला सांगितलं की, “जे यावर वाद घालत आहेत, ते धर्मावरुन राजकारण करत आहेत. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. वास्तविक, यावर वाद घालण्याचं काहीच कारण नाही. पण भाजपकडे निवडणुकीसाठी कोणताही मुद्दा नसल्याने, ते यावर वाद घालत आहेत. आमच्यासाठी धर्मावरुन राजकारण करणं, हा विषयच होत नाही.”

दरम्यान, राहुल गांधींनी गुजरातमधील मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची ही 19 वी वेळ आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनीही यावरुन निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आज आपल्या भाषणात म्हणाले की, “आज सोमनाथ मंदिराची पताका संपूर्ण जगात फडकत आहे. आज जे लोक सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत. पण त्यांना एकदा विचारलं पाहिजे की, तुम्हाला इतिहास माहिती आहे का? कारण, तुमचे पणजोबा, तुमच्या वडिलांचे आजोबा आणि तुमच्या आजींचे वडील, जे देशाचे पहिले पंतप्रधान होते; त्यांनीच जेव्हा सरदार पटेल सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करत होते, त्यावेळी त्यांनी नाकाने कांदे सोल्ले होते.”