नवी दिल्ली : गोव्यातील भेटीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. राफेल करारावरुन राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर मनोहर पर्रिकर यांनी पत्र लिहून प्रश्न उपस्थित केले होते. पर्रिकर यांच्या पत्राला राहुल गांधींनीही पत्राने उत्तर दिलं आहे.


राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल प्रामाणिकपणा दाखवण्याच्या दबावातून तुम्ही माझ्यावर निशाणा साधत आहात, हे मी समजू शकतो. मला तुमच्या सद्यस्थितीबद्दल जाणिव आहे. काल झालेल्या आपल्या भेटीनंतर तुमच्यावर मोठा दबाव असेल. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या इतर साथिदारांबद्दल प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी तुम्ही माझ्यावर निशाणा साधत आहात.


पर्रिकरजी मी दु:खी आहे, तुम्ही मला पत्र लिहिलं मात्र ते मला मिळण्याआधीच मीडियामध्ये लीक करण्यात आलं. मी मोठ्या सन्मानाने सांगतो की, माझा तुमच्याकडचा दौरा पूर्णपणे खासगी होता. तुम्हाला आठवण असेल ज्यावेळी तुम्ही अमेरिकेत उपचार घेत होतात, त्यावेळीही मी तुमच्या तब्येतीचा विचारपूस केली होती, याची आठवण राहुल गांधींनी पत्रातून करुन दिली.


मी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोटाळ्याबद्दल त्यांच्यावर निशाणा साधणे, त्यांना प्रश्न विचारणे हा माझा अधिकार आहे. मी माझ्या भाषणात तेच बोललो जे आधीपासून सर्वांसमोर आहे. मी आपल्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही. मला हतबल होऊन या अनावश्यक आणि दुर्दैवी वादावर बोलावं लागत आहे. कारण तुम्ही मला लिहिलेलं पत्र मीडियामध्ये लीक झालं आहे. तुमची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो, असं राहुल गांधींनी आपल्या पत्रात लिहिलं.





काय आहे प्रकरण?


राहुल गांधी यांनी मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. पर्रिकर यांच्यासोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी म्हटलं की, मी काल पर्रिकर यांना भेटलो. पर्रिकर यांनी मला सांगितलं की, राफेल करार बदलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणमंत्र्यांना विचारलं नाही. त्यामुळे नव्या राफेल कराराशी माझा काहीही संबंध नाही.


राहुल गांधींनी केलेल्या दाव्याला उत्तर देण्यासाठी मनोहर पर्रिकर त्यांना पत्र लिहिलं, त्यात त्यांनी म्हटलं की, आपण केवळ पाच मिनिट भेटलो. त्या भेटीचा वापरही तुम्ही क्षुल्लक राजकारणासाठी करत आहात, या पाच मिनिटांच्या भेटीत एकदाही राफेल करारावर चर्चा झाली नाही. तुम्ही राजकारणासाठी देशाशी खोटं बोलत असल्याचंही पर्रिकर यांनी म्हटलं.