प्रयागराज : राममंदिर उभारणीसाठी आता केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. शंकराचार्यांसोबत साधूसंत 21 फेब्रुवारीला राममंदिरासाठी पहिली वीट रचणार आहेत. त्यासाठी 10 फेब्रुवारीपासून साधूसंत प्रयागराजहून अयोध्येकडे रवाना होतील. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी बोलावलेल्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.


येत्या 10 फेब्रुवारीला म्हणजे वसंत पंचमीनंतर साधू संत अयोध्येसाठी रवाना होतील. त्यानंतर 21 फेब्रुवारीला राम मंदिराची पहिली वीट रचली जाईल, असं धर्मसंसदेत सांगण्यात आलं. याशिवाय 21 फेब्रुवारीपासून राम मंदिराचं बांधकाम होईपर्यंत साधू संत आंदोलन करतील. आंदोलनामध्ये कुणी आल्यास साधू संत गोळी झेलण्यासाठीही तयार असतील, असंही धर्मसंसदेत सांगण्यात आलं.


निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त जमीन वगळता जी आसपासची 67 एकर जमीन आहे, ती मूळ मालकांना परत करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी याचिका केंद्राने कोर्टात केली आहे.


जर ही मागणी मान्य झालीच तर मंदिर निर्मितीसाठी जे काम करायचं आहे, त्याची सुरुवात आसपासच्या परिसरात होऊ शकते. निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकार आणखी एक मास्टरस्ट्रोक मारु शकणार का, याचं उत्तर आपल्याला कोर्टाच्या निकालानंतरच कळू शकेल.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही राम मंदिर प्रकरणी मोठं वक्तव्य केलं. राम मंदिर प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा, असं अमित शाह यांनी म्हटलं.