राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2019 05:07 PM (IST)
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होण्यासाठी हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
नवी दिल्ली : शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होण्यासाठी हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यासाठीच राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. लोकसभेतल्या मोठ्या पराभवानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्य काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या दृष्टीने राहुल आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला तर ती इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल. शरद पवारांनी यापूर्वी 1986 मध्ये त्यांची समाजवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये विलीन केली होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये हे विलीनीकरण पार पडलं होतं. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. काँग्रेसकडे सध्या केवळ 51 खासदारांचे संख्याबळ आहे. लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे 5 खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेमध्ये विलिन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांचे संख्याबळ 55 पेक्षा जास्त होईल, त्यामुळे त्यांना अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवता येईल. व्हिडीओ पाहा 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. काँग्रेसने केवळ 44 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाला मुकावे लागले होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद होते, परंतु काँग्रेसकडे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद नव्हते. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 51 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यंदादेखील काँग्रेसला लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळेच राहुल गांधी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.