नवी दिल्ली : देशात दहा ऑगस्टपर्यंत 20 लाख कोरोनाबाधित होतील, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे देशात आठवड्याभरात 10 कोरोना रुग्ण होतील, असं त्यांनी आठवड्यापूर्वीच सांगितलं होतं. आज देशात कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांवर गेली आहे. या पार्श्वभूमिवर राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, देशात 10 लाखांचा आकडा पार झाला आहे. या गतीने कोरोना वाढत राहिला तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित असतील, असं त्यांनी म्हटलंय. सरकारने या महामारीला रोखण्यासाठी ठोस, नियोजित पावलं उचलायला हवीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.


देशात कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाख पार, 25 हजारांहून अधिक मृत्यू

भारतात कोविडचे 1,005,637 रुग्ण

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 1,005,637 रुग्ण आहेत. तर 25,609 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 343,426 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 636,602 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. भारतात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 32 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.

जगभरात कोरोनाचा कहर

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 39 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाख 92 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 82 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 3,693,700 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 141,095 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 2,014,738 कोरोनाबाधित आहेत तर 76,822 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर  यूकेत 45,119 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 292,552 इतकी आहे.