नवी दिल्ली : सीबीआय प्रकरणातील कारवाईवरुन काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयांबाहेर आज आंदोलन करणार आहे. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल रात्री उशिरा ट्विट करत ही माहिती दिली. सकाळी 11 वाजता राहुल गांधी दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.


राफेल विमान प्रकरणाची चौकशी दाबण्यासाठी आणि अनिल अंबानी यांना वाचवण्यासाठीच सीबीआयच्या संचालकांवर कारवाई करण्यात आल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप सरकारला अक्षरशः धारेवर धरलं.

सीबीआयच्या संचालकांना पंतप्रधानांनी मध्यरात्री 2 वाजता हटवलं. पुरावे नष्ट करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याची टीका राहुल यांनी केलीय. सीबीआयनं राफेल प्रकरणाचा तपास केला असता तर सर्व सत्य जगासमोर आलं असतं आणि म्हणूनच सीबीआयच्या संचालकांवर कारवाई करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केलीय.


आज सुनावणी

सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सरकारने नियमांचे पालन न करताच आपला पदभार काढून घेतला आहे, असे आलोक वर्मा यांची सर्वोच्च न्यायालयातील आव्हान याचिकेत नमूद केलंय. सीबीआयला कोणत्याही दबावाविना काम करता यावे या उद्देशाने संचालकाची नियुक्ती दोन वर्षांसाठी केली जाते. मुदतीपूर्वी संचालक बदलायचा असेल तर उच्चाधिकार समितीची परवानगी घ्यावी लागते.

सीबीआयचं स्पष्टीकरण

आलोक वर्माच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे संचालक आहेत, फक्त त्यांना रजेवर पाठवल्याचं स्पष्टीकरण सीबीआयनं दिलंय. तर, राकेश अस्थानादेखील सीबीआयच्या विशेष संचालकपदी कायम आहेत. परंतु राकेश अस्थाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. फक्त केंद्रीय दक्षता समिती म्हणजेच सीव्हीसी या प्रकरणाची चौकशी करेपर्यंत एम. नागेश्वर राव सीबीआयचे हंगामी संचालक असतील असं सीबीआयच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.