नवी दिल्ली: दिल्लीतील पवारांच्या पुस्तक प्रकाशनासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रण पाठविण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी कार्यक्रमाला येणं टाळलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच नाराज झाली आहे.

या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं सोपं आहे. पण राहुल गांधींना भेटणं कठीण आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते डी पी त्रिपाठी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन आज दिल्लीत झालं. 'अपनी शर्तोंपर' असं या पुस्तकाचं नाव आहे. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी, डी राजा, के सी त्यागी, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, अपक्ष खासदार आणि उद्योगपती नीरज शेखर यांची उपस्थिती होती.