मुंबई : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उद्या भिवंडी कोर्टात हजर राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र त्यापूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर सडकून टीका केली.
मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेताना अगदी जवळच्या लोकांना देखील विश्वासात घेतलं नाही. अर्थमंत्री अरुण जेटलींना देखील या निर्णयाची माहिती नव्हती, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.
नोटा बदलण्यासाठी केवळ गरिब लोकांनाच रांगेत उभा राहून त्रास सहन करावा लागत आहे. काळा पैसा असणारे मात्र यातून सटकले आहेत, अशी टीकाही राहुल गांधींनी केली.
पैसे जमा करण्यासाठी भाजप नेत्यांना अगोदरच माहिती देण्यात आली होती. पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी आधीच पैसे डिपॉझीट कसे केले, असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केला.
काँग्रेस काळ्यापैशाविरोधात आहे. मोदींनी निर्णय घेतला त्याला हरकत नाही. मात्र निर्णय घेण्यापूर्वी काही तरी पूर्व नियोजन करणं आवश्यक होतं, असंही राहुल गांधी म्हणाले.