नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा कार्यकारिणीने अद्याप स्वीकारलेला नाही. त्याउलट काँग्रेस नेते आणि मित्रपरिवाराकडून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.


राहुल गांधी राजीनामा मागे घेण्यास तयार नसल्यामुळे काँग्रेसकडून नव्या अध्यक्षपदासाठी चाचपणी केली जात आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि नव्या दमाच्या नेत्यांचा विचार केला जात आहे. तसेच राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहीले तर काँग्रेसकडून एका कार्यकारी अध्यक्षाची नेमणूक केली जाऊ शकते. किंवा पक्ष चालवण्यासाठी चार ते पाच जणांची समिती नेमली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान तूर्तास हा विषय टळला आहे. राहुल गांधी वायनाड दौऱ्यावरुन परत आल्यानंतरच यासाठी पावलं उचलली जातील.

अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय इतर नेत्यांचा विचार करा, राहुल गांधींचा प्रस्ताव | ABP Majha



दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचा असायला हवा, असे सुचवले आहे. राहुल गांधी या बैठकीत म्हणाले होते की, "मी राजीनामा देतोय म्हटल्यावर लगेच प्रियंकाचे (काँग्रेसच्या सरचिटणीस आणि राहुल गांधी यांची धाकटी बहीण प्रियांका गांधी) नाव सुचवू नका", गांधी घराण्याबाहेरचे नाव हवे आहे. त्यामुळे राहुल काँग्रेसला एका कुटुंबाचा पक्ष या आरोपातून मुक्त करु इच्छितात हे उघड आहे. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा काँग्रेसवर गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष शोधण्याची वेळ आली आहे.

व्हिडीओ पाहा



काँग्रेसकडे पक्षाध्यक्षपदासाठी ए. के. अँटोनी, कॅप्टन अमरिंदर सिंह, अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खरगे, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे पर्याय आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होत होती की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष होतील. परंतु या सगळ्या अफवा असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.