Rahul Gandhi On PM Narendra Modi : देशातील सामान्य नागरिक गर्तेत अडकला आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.  वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून आज काँग्रेसनं दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढली. 'महागाई पर हल्ला बोल' असं या रॅलीचे नाव असून राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस रस्त्यावर उतरले. 


यावेळी राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत. विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही. देशाला रोजगार देणाऱ्यांचा कणा भाजपनं मोडला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मी आता ईडीला घाबरत नाही. मला चौकशीसाठी कितीही वेळा बोलवा, मी घाबरत नाही, असंही ते म्हणाले. 


'भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करत आहेत'


राहुल गांधी म्हणाले की, भारतात आज भीती वाढत आहे. आज देशाचं भविष्य भीतीच्या सावटाखाली आहे. लोकांना महागाई आणि बेरोजगारीची भीती आहे. द्वेषाने देश कमकुवत होतोय. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करत आहेत आणि जाणूनबुजून देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 


राहुल गांधींवर हल्लाबोल करत म्हणाले की, शेतीशी संबंधित तीन काळे कायदे उद्योगपतींसाठी करण्यात आले. पण शेतकऱ्यांच्या एकजुटीने आणि ताकदीने सरकारला हे कायदे मागे घेण्यास भाग पाडले. जीएसटीमुळे छोट्या व्यावसायिकांना संपवलं आहे. UPA सरकारच्या काळात 27 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढल्याचा दावा राहुल गांधींनी केला. अन्नाचा अधिकार, नरेगा, कर्जमाफी या योजनांमुळे आपण हे सर्व शक्य केले होते, पण मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा गरीबीच्या खाईत लोटले गेले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.


राजा मित्रांच्या कमाईमध्ये व्यस्त, जनता महागाईने त्रस्त


रॅलीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "राजा मित्रांच्या कमाईमध्ये व्यस्त आहे, जनता महागाईने त्रस्त आहे. आज लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागतो. या त्रासाला फक्त पंतप्रधानच जबाबदार आहेत. आम्ही महागाई विरोधात आवाज उठवत राहू, राजाला ऐकावे लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.