Ghulam Nabi Azad : गेल्या पाच दशकापासून काँग्रेस (Congress) पक्षाचं काम करणाऱ्या गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. आता पुढे ते कोणता निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, गुलाम नबी आझाद हे आज जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) दौऱ्यावर आहेत. त्यांची आज जाहीर सभा होणार असून, या सभेत ते मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजपासून आझाद नवी इनिंग सुरु करणार का? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.


दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये असणार आहेत. यादरम्यान लोकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, काँग्रेसला रामराम केल्यानंतर गुलाम नबी आझाद पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. आज ते सैनिक कॉलनीत जाहीर सभा घेणार आहेत. या जाहीर सभेत सुमारे 20 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद आज या जाहीर सभेत आपल्या नव्या पक्षाची घोषणा करु शकतात. त्यामुळं गुलाम नबी आझाद यांचा हा जम्मू काश्मीरचा दौरा अत्यंत्य महत्वाचा मानला जात आहे.


गुलाम नबी आझाद यांची जंगी मिरवणूक निघणार


आज जम्मू काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांचे भव्य स्वागत केले जाणार असल्याची माहिती गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा देणार्‍या आमदारांपैकी असलेले जी एम सरोरी  यांनी सांगितले. आज सैनिक कॉलनीत त्यांची जाहीर सभा होणार आहे. तसेच त्यांची मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे. गुलाम नबी आझाद यांनी दिलेल्या राजीनाम्यात पक्षाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. प्रत्येक निर्णय कोणाशीही सल्लामसलत न करता घेतल्याचे आझाद म्हणाले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान होत असल्याचा आरोप देखील आझाद यांनी केला होता. गुलाम नबी यांच्या राजीनाम्यानंतर 8 माजी मंत्री, एक माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत.


आझाद नवी पक्ष स्थापन करणार का?


गुलाम नबी आझाद आता नव्या पक्षाची स्थापना करुन जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस विशेषतः राहुल गांधी आता तरी शहाणे होतील आणि पक्ष उभारण्यासाठी नव्याने प्रयत्न करतील, ज्येष्ठ नेत्यांना उचित मान देतील अशी अपेक्षा आहे. पण त्यांचे एकूण वागणे बघता ते गुलाम नबी आझाद यांच्या या राजीनाम्याकडेही गंभीरतेने पाहाणार नाहीत असे दिसते आणि गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी जे घाबरले ते आझाद असे म्हटले. 


महत्त्वाच्या बातम्या: