Rahul Gandhi Slams PM Modi :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारवर टीका केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीनंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गाडी रिव्हर्स गिअरमधून असून त्याचा ब्रेक फेल झाला असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. 


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले की, विकासाच्या जुमल्यांमुळे लाखो कुटुंबांना पुन्हा चुलीचा वापर करण्यास भाग पाडले जात आहे. मोदीजींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गिअरमध्ये असून त्याचे ब्रेकही फेल झाले आहेत. 






राहुल गांधी यांनी एका वृत्ताचा हवाला देत हे ट्वीट केले. एका सर्वेक्षण अहवालानुसार, स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने 42 टक्के कुटुंबीयांनी स्वयंपाकासाठी पुन्हा एकदा लाकडाचा वापर करणे सुरू केले आहे. मागील काही दिवसांमध्ये सातत्याने गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे.


राहुल गांधी यांनी या आधी देखील महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिवाळीतही महागाईने उच्चांक गाठला असून मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशीलपणा असायला हवा होता, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते. तर, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली होती. भाजप सरकारच्या लुटीच्या विचारांमुळे सणांच्या आधी महागाई कमी करण्याऐवजी गॅस सिलेंडर. पेट्रोल-डिझेल, तेल, भाजी आदींचे दर गगनाला भिडले आहेत. निवडणुकीआधी भाजप सरकार 1-2 रुपयांची कपात करून लोकांकडे मते मागायला जातील. मात्र, जनता त्यांना माफ करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.