पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं. मग त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास बसला असता, अशी उपहासात्मक टीका माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली.
सर्जिकल स्ट्राईक बाबत प्रश्रचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेणं मनोहर पर्रिकर यांनी सुरुच ठेवलं आहे. पणजी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पर्रिकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला.
सर्जिकल स्ट्राईक करून आपण गोव्यावरचं देशाचं कर्ज फेडलं असल्याचं भाष्य पर्रिकर यांनी यापूर्वी केलं होतं. त्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पर्रिकर यांनी आज थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नेम धरला.
'सर्जिकल स्ट्राईकची प्रक्रिया आणि नियोजन हे अत्यंत गुप्त ठेवावं लागतं. त्याविषयी कुणाला पूर्वकल्पना देता येत नाही. पण आम्ही जर लष्करासोबत राहुल गांधी यांना पाठवलं असतं, तर काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईक झाला यावर विश्वास ठेवला असता ना?,' असा प्रश्न पर्रिकरांनी उपस्थित केला.
'मी सर्जिकल स्ट्राईकविषयी राजकीय अर्थाने बोलत नाही. मात्र या ऑपरेशनवर विश्वास बसण्यासाठी विरोधी पक्षातील लोकांना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्कराने सोबत न्यायला हवं होतं का?' अशी विचारणा पर्रिकर यांनी केली.
'सर्जिकल स्ट्राईकची माहिती फक्त चौघांनाच होती. मी, पंतप्रधान मोदी, लष्कर प्रमुख आणि मिलिटरी ऑपरेशनचे डायरेक्टर जनरल...’ असंही पर्रिकर म्हणाले.
'केंद्रात पुन्हा मोदी सरकार यायला हवं. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते गरजेचं आहे. विरोधक अल्पसंख्यांकांमध्ये अकारण भीती निर्माण करत आहेत. मुस्लीम मतदारही भाजपसोबत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ते दिसून आलं. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकेल,असा विश्वास पर्रिकर यांनी व्यक्त केला.
सर्जिकल स्ट्राईकवेळी राहुल गांधींना लष्करासोबत पाठवायला हवं होतं : पर्रिकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2018 10:58 PM (IST)
पणजी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पर्रिकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. सर्जिकल स्ट्राईक करून आपण गोव्यावरचं देशाचं कर्ज फेडलं असल्याचं भाष्य पर्रिकर यांनी यापूर्वी केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -