नवी दिल्ली : माझं गाण्यातील करिअर फक्त एका दिवसाचं होतं, तो दिवस माझ्या सांगीतिक कारकीर्दीतला पहिला आणि शेवटचा दिवस ठरला असा मजेशीर किस्सा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात सांगितलां.


 

राजीव गांधी सद्भावना पुरस्कार देण्यासाठी आलेल्या कार्यक्रमात राहुल गांधींनी आपल्या पहिल्या सांगीतिक अनुभवाबद्दल सांगितलं. राहुल यांना गाण्याबद्दल विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं की, "गाण्यात माझं करिअर फक्त एका दिवसाचं होतं. 10 वी मध्ये असताना माझ्या सिनिअरने मला गाण्यास सांगितलं आणि स्टूलवर चढवून धमकावलं. मी घाबरून गाणं म्हटलं आणि पळून गेलो. तेव्हा माझ्या सिनिअर्सनी मी फक्त गोंधळ करत असल्याचं सांगितलं. त्यादिवसानंतर मी कधीच गाण्याच्या फंदात पडलो नाही."

 

यावर्षीचा राजीव गांधी सद्भावना पुरस्कार ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांना देण्यात आला. शुभा मुदगल यांना सोनिया गांधींनी शुभेच्छा दिल्याचंही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमात इच्छा असूनही उपस्थित राहता आलं नाही. प्रियंका आणि आपण त्यांना समजावून विश्रांती घेण्यास सांगितल्याचंही राहुल यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधीची तब्येत सुधारत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत:ला बेसूर म्हणत भारतातील संगीत हे जातीय सलोखा जपण्यासारखंच असल्याचं सांगितलं आहे. तसंच सोनिया गांधींनाही या कार्यक्रमात येण्याची इच्छा होती. पण प्रकृती ठीक नसल्याने त्या येऊ शकल्या नाहीत, असंही ते म्हणाले.