नवी दिल्ली : राहुल गांधींनी अधिकृतरित्या आपलं काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आहे. चार पानी पत्र लिहित राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपद सोडल्याचं जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला आपण जबाबदार असल्याचं या पत्रात राहुल गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही राहुल गांधींनी पत्रात नमूद केलं आहे.

राहुल गांधींनी आपल्या चार पानी पत्रात काँग्रेस नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कुणालाही आपली सत्ता आणि पद सोडायचं नाही. भारतात सत्तेला चिकटून राहण्याचा मोह नेत्यांना आवरता येत नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी ट्विटर अकाऊंटवरील आपली ओळखही बदलली आहे. काँग्रेस अध्यक्षऐवजी आता काँग्रेस कार्यकर्ता आणि खासदार असा उल्लेख राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आला आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेस अध्यक्ष हा उल्लेख काढून टाकला आहे. आता फक्त काँग्रेस नेते आणि खासदार इतकाच उल्लेख राहुल गांधींनी ट्विटरवर ठेवला आहे.


राहुल गांधी उद्या मुंबईत

काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या गुरुवारी मुंबईत येत आहेत. शिवडी न्यायालयात आरएसएस संदर्भातील प्रकरणात राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी सकाळी साडे नऊ वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील. न्यायालयात 11 वाजता हजेरी लावल्यानंतर पुन्हा लगेच दिल्लीला रवाना होणार आहेत.

पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी : राहुल गांधी

“काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या 2019 मधील पराभवाची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारत आहे.  काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी जबाबदारीमध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं आहे. या पराभवाची जबाबदारी बाकीच्यांनीही घेणं गरजेचं आहे. सत्तेला चिकटून राहण्याची सवय भारतात आहे. ती सोडणं गरजेचं आहे.” असं राहुल गांधी यांनी आपल्या चार पानी पत्रात म्हटलं आहे.

“काँग्रेससाठी सेवा करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, ज्या पक्षाची मूल्य आणि आदर्शांनी देशाची सेवा केली आहे. मी देश आणि संघटनेचे आभार मानतो. जय हिंद” म्हणत राहुल गांधींनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे.
राहुल गांधींनी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी ते अध्यक्ष नसल्याचं सांगत लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होण्याचं सूतोवाच केलं.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी 25 मे रोजीच काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. मात्र नेत्यांनी राहुल गांधींच्या मनधरणीचे प्रयत्न चालवले होते. मात्र आज चार पानी पत्र लिहून अधिकृतपणे काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधींनी सोडलं आहे.