Rahul Gandhi PC LIVE : देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे.  काँग्रेसनं (congress) जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं (BJP) 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. काँग्रेसने (Congress) आज (5 ऑगस्ट) महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर एक पाऊल पुढे जात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.


राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाहीत तर आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत. राहुल गांधी म्हणाले की, जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही. महागाईबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळत नाही.  ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जात आहे. सरकारचं म्हणणं आहे की, कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. 5 दशलक्ष लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु सरकार म्हणत आहेत की हे सर्व खोटे आहे. बेरोजगारीबाबत सरकार म्हणते की यात तथ्य नाही. त्यांच्या हातात सगळी संवादाची साधनं आहेत, असंही ते म्हणाले.  


ईडीच्या कारवाईबाबत राहुल गांधी म्हणाले की, जेवढं मी बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरत असतो. या लोकांना भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते. लोकांच्या ताकतीला घाबरतात. महागाई आणि बेरोजगारीची भीती या लोकांना आहे. हे लोक 24 तास खोटे बोलण्याचे काम करतात, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.


राहुल गांधी म्हणाले की, केवळ काँग्रेसच नाही तर देशातील कोणताही अभिनेता किंवा कोणीही व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलला तर त्याच्यामागे संपूर्ण यंत्रणा उभी केली जाते. भारतात लोकशाही संपली आहे. त्याचे परिणाम भोगावे लागतील. भारतीय जनता गप्प बसणार नाही, असंही ते म्हणाले. 


देशात ईडीच्या दहशतीचे वातावरण - गेहलोत
देशात ईडीची दहशत असल्याची थेट टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावेळी केली. बेरोजगारीनं देशात हाहाकार माजला आहे. सरकारच्या विरोधात बोलणारांची गळचेपी करण्यात येत असल्याचंही गेहलोत म्हणाले.  अशोक गेहलोत म्हणाले की, देशात संविधानाची पायमल्ली केली जात आहे. देशात ईडीच्या दहशतीचे वातावरण आहे. देशात अतिशय धोकादायक खेळ सुरू आहे.  माध्यमांनी आज धैर्य दाखवण्याची गरज आहे. आज जर आपण गप्प बसलो तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही, असं गेहलोत म्हणाले.