Rahul Gandhi on pm modi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींना पोकळ भाषण बंद करा म्हणत हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी यांच्या भाषणाचा समाचार घेत तीन सवाले आहेत. राहुल गांधी यांनी मोदींना 3 प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न दहशतवाद, पाकिस्तानचे विधान आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा यावर आहेत. एक्स पोस्टमध्ये (ट्विटर) विचारलेल्या प्रश्नांसोबत राहुल यांनी पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप देखील जोडली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी असे म्हणताना ऐकू येतात की, जेव्हा पाकिस्तानने म्हटले की ते यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी धाडस दाखवणार नाही, तेव्हा भारतानेही त्याचा विचार केला.

मोदीजी, पोकळ भाषणे देणे थांबवा

राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मोदीजी, पोकळ भाषणे देणे थांबवा. फक्त इतकंच सांगा, पाकिस्तानच्या दहशतवादावरील शब्दांवर तुम्ही का विश्वास ठेवला? ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन तुम्ही भारताच्या हिताचे बलिदान का दिले? तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का उसळतं? बिकानेरमध्ये पंतप्रधान म्हणाले होते की, माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेत हल्लाबोल केला.  

काय म्हणाले होते मोदी? 

पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकू शकत नाही. म्हणूनच त्यांनी दहशतवादाला भारताविरुद्ध शस्त्र बनवले आहे. पाकिस्तान एक गोष्ट विसरला की आता भारतमातेचे सेवक मोदी छाती फुगवून उभे आहेत. मोदींचे मन थंड आहे, थंडच राहते, परंतु मोदींचे रक्त गरम आहे. आता मोदींच्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा सामना करण्यासाठी तीन तत्वे मांडली. पहिले, जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आपले सैन्य वेळ ठरवेल, पद्धत देखील आपल्या सैन्याने ठरवेल आणि परिस्थिती देखील आपल्याच असतील. दुसरे, अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही. तिसरे, आपण दहशतवादाचे स्वामी आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार वेगळे पाहणार नाही. आपण त्यांना एक मानू.

जयराम रमेश म्हणाले, पंतप्रधानांचे बिकानेरमधील पोकळ चित्रपट संवाद

पंतप्रधान मोदींच्या बिकानेर रॅलीवर, काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनीही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, बिकानेरमधील सार्वजनिक सभांमध्ये भव्य पण पोकळ चित्रपट संवाद फेकण्याऐवजी, पंतप्रधानांनी त्यांना विचारल्या जाणाऱ्या गंभीर प्रश्नांची उत्तरे द्यावीत. जयराम यांनी विचारले की, पहलगामचे क्रूर मारेकरी अजूनही मोकाट का आहेत? काही वृत्तांनुसार, गेल्या 18 महिन्यांत पूंछ, गगनगीर आणि गुलमर्ग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी हे दहशतवादी जबाबदार होते. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक का घेतली नाही आणि त्यांनी विरोधी पक्षांना विश्वासात का घेतले नाही? रमेश म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीन-पाकिस्तानमधील खोल संगनमत स्पष्ट असताना, 22 फेब्रुवारी 1994 च्या एकमताने पारित झालेल्या ठरावाची पुनरावृत्ती करण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले नाही? गेल्या दोन आठवड्यात राष्ट्रपती ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी अमेरिकेच्या भूमिकेबद्दल वारंवार केलेल्या दाव्यांवर तुम्ही गप्प का राहिलात?

इतर महत्वाच्या बातम्या