Rahul Gandhi on PM Modi : तेलंगणातील करीमनगर निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा उद्योगपती गौतम अदानी आणि अंबानी यांचे नाव घेत राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली होती. यानंतर आता राहुल गांधी यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. ते टेम्पोमध्ये पैसे देतात, हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? अशी विचारणा राहुल गांधी यांनी करत एक काम कमी करा, त्यांना सीबीआय ईडीला पाठवा, लवकरात लवकर पूर्ण माहिती मिळवा, असा टोला त्यांनी लगावला आहे. 






राहुल गांधी यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, नमस्कार मोदी जी, थोड घाबरले आहात का? तुम्ही पहिल्यांदाच अदानी अंबानींबद्दल जाहीरपणे बोललात. तुम्हाला हे देखील माहित आहे की ते टेम्पोमध्ये पैसे देतात, हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम कमी करा, त्यांच्याकडे ईडी सीबीआय पाठवा, लवकरात लवकर पूर्ण माहिती मिळवा, मोदीजी घाबरू नका. मी देशाला पुन्हा पुन्हा सांगत आहे की नरेंद्र मोदीजींनी जेवढा पैसा त्यांना दिला आहे, तेवढाच पैसा आम्ही भारतातील गरीब लोकांसाठी देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी निश्चित योजना, या योजनांद्वारे कोट्यवधी लखपती करणार आहोत. त्यांनी 22 अब्जाधीश केले आम्ही करोडो लखपती करणार आहोत. 






दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अदानी-अंबानी यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. खरगे यांनी ट्विट करून म्हटले, काळ बदलत आहे. मित्र आता मित्र राहिला नाही..! निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आज पंतप्रधान आपल्याच मित्रांवर हल्लेखोर झाले आहेत, यावरून मोदींची खुर्ची डळमळीत झाल्याचे दिसून येते. हा निकालांचा खरा ट्रेंड आहे.


काय म्हणाल होते पीएम मोदी?


पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर अंबानी आणि अदानी यांची नावे घेणे का थांबवले? काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी त्या उद्योगपतींकडून किती पैसे मिळाले आहेत. मोदी पुढे म्हणाले की, गेल्या 5 वर्षांपासून काँग्रेसचे राजपुत्र सकाळी उठल्याबरोबर जपमाळ करत होते. त्यांचे राफेल विमान ग्राउंड झाले. तेव्हापासून त्यांनी नवीन जपमाळ जपण्यास सुरुवात केली. 5 वर्षे एकच जपमाळ जपायची, '5 उद्योगपती', मग हळूहळू 'अंबानी', 'अदानी' म्हणू लागले.






पीएम मोदी म्हणाले, पण निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी आणि अदानींना शिव्या देणे बंद केलं आहे. आज मला तेलंगणाची भूमीतून विचारायचं आहे की, मला काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचे आहे की, त्यांना अदानी आणि अंबानींकडून किती माल मिळाला? काळ्या पैशाने भरलेली किती पोती घेतली? अंबानी आणि अदानींना शिव्या देणं रातोरात थांबवलं असा कोणता व्यवहार झाला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या