अमेठी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ अमेठीत ते हारवले असल्याचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तर काँग्रेसनं या सर्वप्रकारला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरलं आहे.

अमेठीमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये म्हणलंय की, ''राहुल हारवले आहेत. ज्यामुळे मतदारसंघाचा विकास ठप्प आहे. त्यांच्या व्यवहारामुळे सर्वसामान्य जनता स्वत:ला दोषी मानत आहे. अमेठीत त्यांची (राहुल गांधीची) माहिती देणाऱ्याला योग्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.''



हे पोस्टर जारी करणाऱ्याचं नाव 'अमेठीची जनता' असल्याचं म्हणलं आहे. पण यावर प्रकाशक आणि मुद्रकाचं नाव छापण्यात आलं नाही.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्र यांनी या प्रकाराला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरलं आहे. तसेच या आधीही अशा घटना घडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय या प्रकरणाची पोलीस तक्रार करुन, सखोल चौकशीची मागणीही मिश्र यांनी केली आहे.

तर भाजप जिल्हाध्यक्ष उमाशंकर पांडे यांनी काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले आहेत.पांडे म्हणले की, ''या घटनेचं भाजप आणि संघाशी देणं-घेणं नाही. जर राहुल गांधींनी अमेठीसाठी काहीतरी केलं असतं, तर ही वेळ आली नसती.''

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक बी.सी. दुबे यांनी काँग्रेसकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही तक्रार दाखल नसल्याचं म्हणलं आहे. तसेच जर यासंदर्भात तक्रार दाखल झाली, तर त्याचा तपास करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधींनी याआधी फेब्रुवारीमध्ये आपल्या मतदार संघाचा दौरा केला होता. शिवाय 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 चं चौपद्रीकरणातील प्रकल्पबाधितांची भेट घेऊन चर्चा केली होती.