नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून नव्या नोटा छपाईचे आदेश दिल्यानंतर आज राज्यसभेत याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभेत आज काँग्रेससह इतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधत राज्यसभेत चांगलाच गोंधळ घातला. पण सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचा वेळ वाया जात असल्याचा आरोप केला.


नोटाबंदीनंतर केंद्र सरकार नव्या नोटा छपाईवेळी वारंवार नोटांच्या डिझाईन आणि डिनोमिनेशनमध्ये बदल करत आहे. यामुळे सरकार देशातला मोठा घोटाळा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.



त्यातच केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या तयारीत आहे. त्यातच नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आणलेल्या 2000 रुपयांच्या नव्या नोटा बंद करण्यात येणार असल्याच्या अफवेने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे यावरुनही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचं कामकाज पाचवेळा बंद पाडलं. काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यांनी वारंवार वेलमध्ये येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.



काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी शून्य प्रहरामध्ये दोन प्रकारच्या नोटा छपाईचा मुद्दा उपस्थित केला. ''या नव्या नोटांमधील एका प्रकारच्या नोटा या सत्ताधारी (भाजप आणि सहकारी पक्ष)साठी आहेत. तर दुसऱ्या प्रकारच्या नोटा या सर्वसामान्य नागरिकांसाठी चलनात आणल्या जाणार आहेत,'' असा आरोप केला. तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकारकडून देशातला सर्वात मोठा घोटाळा सुरु असल्याचा आरोप केला.

यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसलाच दोषी ठरवलं. तसेच काँग्रेस सदस्या विनाकारण गोंधळ घालत असल्याचा आरोप केला. ''काँग्रेसकडून या आधी राज्यसभा निवडणुकीत नोटाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण नंतर याबाबतची तरतूद त्यांच्याच कार्यकाळात करण्यात आल्याचं समजल्यानंतर, हा गोंधळ शांत झाला,'' असा आरोप अरुण जेटलींनी यावेळी केला.