नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. रविवारी तामिळनाडूच्या इरोड येथे रोड शो दरम्यान उपस्थित लोकांना संबोधित करताना राहुल म्हणाले की, मी येथे काय करावे हे सांगण्यासाठी आलो नाही किंवा “मन की बात” बद्दल तुमच्याशी बोलण्यासाठी आलो नाही. मी येथे आपल्या समस्या ऐकण्यासाठी आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी आलो आहे.





त्याआधी राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर वाढत्या इंधन दराबाबत जोरदार हल्ला चढवला होता. सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे आणि मोदी सरकार कर वसूल करण्यात व्यस्त आहे. राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, "जीडीपी 'म्हणजेच गॅस-डिझेल-पेट्रोलमध्ये मोदीजींनी प्रचंड वाढ केली आहे. जनतेच्या महागाईमुळे त्रस्त असलेले मोदी सरकार कर वसुलीत व्यस्त आहेत. मोदी सरकार लोकांच्या आशा व गरजा दुर्लक्षित करून काही भांडवलदारांसाठी काम करत आहे, असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.





राहुल गांधी यांनी काल तिरुपुरात म्हटलं होतं की, काँग्रेस सरकारमध्ये आली तर ते जीएसटीमध्ये योग्य ते बदल करतील. राहुल गांधी यांनी लघु व मध्यम उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना, 'एक कर, किमान' हे तत्त्व कॉंग्रेस सरकारमध्ये लागू केले जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिले.


यावर्षी एप्रिल-मे महिन्यात तामिळनाडू विधानसभेची निवडणूक होणार आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. राज्यातील अण्णाद्रमुक सरकारने केंद्र सरकारशी करार केला असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीआय आणि इतर एजन्सीचा वापर करून त्यांना जे हवे आहे ते करत आहे. त्यांनी तीन दिवसांच्या तमिळनाडू दौर्‍याची सुरुवात कोयंबटूर येथून केली. यादरम्यान ते लोकांना भेटले आणि अनेक ठिकाणी लोकांना संबोधित केले.