गांधीनगर: गुजरातमध्ये मतदानादिवशी भाजपला करंट/शॉक बसेल, असा हल्लाबोल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केला. ते गुजरातमधील भरुचमध्ये बोलत होते.
राहुल गांधी सध्या तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. भरुच हा राहुल गांधींचे आजोबा फिरोज गांधी यांचा जिल्हा आहे. भरुचमधील सभेत राहुल गांधींनी नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी आदी मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला.
चीन दररोज 50 हजार युवकांना रोजगार देतो आणि भारतात फक्त 450 लोकांना रोजगार मिळतो. हा मेक इन इंडिया ठरु शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
पैसे नाहीत, तर उपचार नाहीत हे गुजरात मॉडेल
राहुल गांधींनी गुजरात मॉडेलवर हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले, “गुजरात मॉडेल हे उद्योजकांसाठीच आहे, गरीबांसाठी नाही. गरिबांची जमीन, वीज, पाणी काढून घेऊन ते उद्योगपतींना पुरवण्याचं काम मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी करत आहेत. हेच त्यांचं गुजरात मॉडेल आहे.”
जीएसटीची अंमलबजावणी योग्य नाही
जीएसटी हा चांगला विचार होता, मात्र त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. यामुळेच नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. देशात एकच टॅक्स हवा पण त्याचा दर 18 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. पण सध्या तो 28 टक्के इतका ठेवण्यात आला आहे. याशिवाय जीसएटी एकदम लागू करणं चुकीचं आहे, ती हळूहळू लागू करणं गरजेचं होतं, असं राहुल गांधी म्हणाले.