Congress Leader Rahul Gandhi PC: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींनी (PM Modi) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिलेल्या उत्तरावर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर गेल्या अनेक महिन्यांपासून जळतंय. मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. कधी वादळ आलं, कधी त्सुनामी आली, प्रत्येक राज्यात गेलो. पण मणिपूरमध्ये जे पाहिलं ते यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. तसेच, मोदी मात्र त्यांच्या भाषणात दोन तास चेष्ठा करत होते. ते हसत-हसत बोलत होते, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. 


काँग्रेस नेते राहुल गांधी बोलताना म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल संसदेत 2 तास 13 मिनिटं भाषण केलं. त्यापैकी शेवटच्या 2 मिनिटांत ते मणिपूरबद्दल बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. लोक मारले जात आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत, मुलांना मारलं जात आहे. तर मोदी काल हसत बोलत होते, चेष्टा करत होते, हे त्यांना शोभा देत नाही. भारताचे पंतप्रधान आहेत, जर देशात हिंसा होत असेल तर पंतप्रधानांनी दोन तास थट्टा करु नये. विषय काँग्रेस नव्हता, राहुल गांधी नव्हता तर मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होतंय आणि ते रोखलं का जात नाही? हा मुद्दा होता." 


मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली, असं का म्हणालो मी? राहुल गांधींचं स्पष्टीकरण 


राहुल गांधी म्हणाले की, "जे मी मणिपूरमध्ये पाहिले हे पहिलं घडलं नाही. मी संसदेत बोललो की, पंतप्रधान मोदी, शहांनी भारतमातेची हत्या केली. मणिपूरमध्ये भारताला संपवलं आहे. मी हे का बोललो? तर मी जेव्हा मणिपूरमध्ये पोहोचलो, जेव्हा तिथे दौरा केला. आम्ही मैतेई परिसरात गेलो, आम्हाला स्पष्ट सांगितलं की, तुमच्या सुरक्षेत जर कोणी कुकी असेल तर त्याला इथे आणू नका. कारण आम्ही त्याला मारुन टाकून. जेव्हा कुकी परिसरात गेलो आम्हाल सांगितलं की, सुरक्षेत जर कोणी मैतेई असेल तर त्याला इथे आणू नका त्याला गोळी झाडू. आम्हाला मैतेईना दूर ठेवावं लागलं आणि कुकीला दूर ठेवावं लागलं. आज मणिपूरचे दोन भाग झाले हे सत्य आहे. आज राज्याची हत्या केली आहे.  त्यामुळे मी म्हटलं की, मणिपूरमध्ये भारताची हत्या केली. 


"काल मी पंतप्रधान हसताना, थट्टा करताना पाहिलं तेव्हा भारताचे पंतप्रधान अशाप्रकारे कसं काय बोलू शकतात? पंतप्रधानांना आपल्या देशात काय सुरु आहे, हे माहित नाही? ते जाऊ शकत नाहीत त्याची कारणं आहे. जाऊ शकत नाही, तर मणिपूरबद्दल बोला तरी. मणिपूरमध्ये होतंय ते भारतीय सैन्य दोन दिवसात थांबवू शकतं. पंतप्रधानांना मणिपूरला जळू द्यायचं आहे, शांत करायचं नाही.", असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.