Rahul Gandhi On PM Modi :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देशभरात मृत्यूचे तांडव सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे थाली वाजवण्यास सांगत होते, मोबाईल टॉर्च लावण्यास सांगत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान मोदी हे भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा बोचरा वारही राहुल गांधी यांनी केला.


राजस्थानमधील चुरू येथील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल यांनी म्हटले की, आमचे सरकार गरिबांसाठी काम करते. सामान्य लोकांचे सरंक्षण करतो. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी लागू केला आणि आता देशातील शेतकऱ्यांना कर भरावा लागत आहे.  त्यांनी नोटाबंदी केली आणि छोटे व्यापारी, उद्योजकांना उद्धवस्त केले. 


काँग्रेसचे सरकार गरिबांसाठी काम करतंय


राहुल गांधी यांनी जाहीर सभेत म्हटले की, आज लोक पीएम मोदींच्या आश्वासनांवर हसतात. 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. लोकांना ते मिळाले का? मोदींचा हमीभाव म्हणजे अदानीचा हमीभाव आणि काँग्रेसचे सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांचे सरकार असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. 


तुम्हाला अदानींचे सरकार हवे आहे की शेतकरी, मजूर आणि तरुणांचे सरकार हवे? असा थेट सवाल राहुल यांनी जाहिर सभेत असणाऱ्यांना लोकांना केला. राजस्थान सरकारने लोकांसाठी खूप काम केले असून भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही ज्या योजना राबवल्या, त्या रद्द करतील आणि अब्जाधीशांसाठी काम करेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.


पंतप्रधान मोदी श्रीमंतांसाठी काम करत आहेत


राहुल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोप करणारे भाषण केले. जिकडे पाहावे तिकडे अदानी काही ना काही धंदा करत आहे. विमानतळ, बंदरे, सिमेंट प्लांट, रस्ते सर्व त्याच्या मालकीचे आहेत. ते (पीएम मोदी) श्रीमंतांसाठी काम करतात. ते अदानीला मदत करतात, अदानी पैसे कमवतात आणि तो पैसा परदेशात वापरला जातो, असेही त्यांनी म्हटले.


कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला काँग्रेसची साथ


कृषी कायद्याबाबत राहुल गांधी म्हणाले, "पीएम मोदींनी कृषी कायदा आणला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगितले, पण त्याविरोधात देशातील सर्व शेतकऱ्यांनी धरणे-आंदोलन केले. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून अदानी-अंबानी यांच्या हिताचा असल्याचे सांगितले. काँग्रेसनेदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साथ दिली आणि हा काळा कायदा हाणून पाडला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.