नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या 5 दिवसाच्या कार्यकाळात एकही दिवस राहुल गांधी सभागृहात हजर राहिले नाही. सध्या लोकसभेत महत्वाचे विषय चर्चीले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अनुपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लोकसभेत सध्या दिल्लीतील वाढलेलं प्रदूषण, एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप), जम्मू काश्मीरची परिस्थिती, गांधी कुटुंबाची काढलेली एसपीजी सुरक्षा यावरुन संसदेच्या खालच्या सभागृहात चर्चा होत आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी उपस्थित का नाहीत? असे प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील 5 दिवसात फक्त एकच दिवस सभागृहात उपस्थित राहिले आहेत. यावरुन भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी टीका केली आहे. तरुण खासदारांनी सभागृहात गैरहजर राहणे निराशाजनक असल्याचे ते म्हणाले. आम्ही वयस्क असतानाही सभागृहात हजर राहतो. या खासदारांचा असा दृष्टीकोण योग्य नसल्याचे पाल म्हणाले. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडावे म्हणून ते आपल्याला संसदेत पाठवतात. मात्र, तरीही राहुल गांधी एकही दिवस सभागृहात हजर नसल्याची टीका भाजप नेत्याने केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात.

लोकसभेत मांडली जाणारी महत्वाची विधयके -
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एनआरसी)-
एनआरसीवरुन सध्या सत्ताधारी भाजपला कोंडीत सापडली आहे. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत उत्तर दिले. धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. एनआरसीच्या आधारे नागरिकत्व सुनिश्चित केले जाईल आणि ते संपूर्ण देशात लागू करण्यात येईल, असं शहा यांनी सांगितलं.
दिल्लीचे वाढते प्रदूषण -
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या प्रदूषणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार काकोली घोष यांनी तोंडाला मास्क घालून सभागृहात दाखल झाल्या होत्या. मंत्री आणि खासदारांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन देखील काकोली घोष यांनी केले.
जम्मू काश्मीरमधील परिस्थिती -
काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरुन काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती संपूर्णपणे सामान्य असल्याचा दावा केला आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यास 4 महिने पूर्ण होत आहे.

गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटवल्याने संसदेत गोंधळ, सरकारने सूडबुद्धीने सुरक्षा हटवल्याचा आरोप