नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. या ठिकाणी पक्षाला खातंही खोलता आले नाही. रात्री आठ वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार, टीएमसी एकूण 292 जागांपैकी 216 जागा जिंकून नवा रेकॉर्ड प्रस्तापित करण्याच्या स्थितीत आहे. त्याचबरोबर भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. तर एक जागा अन्य एकाच्या खात्यात जातना पहायला मिळत आहे.


2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (TMC) 211 जागा जिंकल्या होत्या. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा आणि डाव्या पक्षांना 26 जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी काँग्रेस पक्षाला मोठा झटका पोहचला आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या मोठ्या विजयाचे अभिनंदन केले आहे. भाजपला पराभूत केल्याबद्दल ममता जी आणि पश्चिम बंगालच्या जनतेचे अभिनंदन करतो असे त्यांनी ट्विट केलं आहे.


विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीबद्दल राहुल गांधी म्हणाले की, लोकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. पक्षाची मूल्ये आणि आदर्शांसाठी संघर्ष करत राहिल. त्यांनी ट्वीट केले की, “आम्ही नम्रतेने जनादेश स्वीकारतो. आपल्या कार्यकर्त्यांचे आणि ज्यांनी आम्हाला समर्थन दिले त्या लक्षावधींचे आभार. आम्ही मूल्ये आणि आदर्शांसाठी आपला लढा सुरूच ठेवू. जय हिंद.''


तामिळनाडूमधील विजयाबद्दल राहुल गांधी यांनी द्रमुकचे नेते एमके स्टालिन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "तामिळनाडूच्या लोकांनी बदलासाठी मतदान केले. आम्ही तुमच्या (स्टालिन) नेतृत्वावरील विश्वास सार्थ ठरवू.” या निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढल्या आहेत.