नवी दिल्ली : भारताने अंतराळ क्षेत्रात आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. त्यामुळे अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अंतराळातील यशस्वी कामगिरीबद्दल 'डीआरडीओ'च्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "वेल डन डीआरडीओ, तुमच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे." ट्वीटमध्ये राहुल गांधींनी हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण राहुल गांधीनी मोदींचं अभिनंदन करण्याऐवजी त्यांना 'वर्ल्ड थियएटर डे' (जागतिक रंगभूमी दिन) च्या शुभेच्छा दिल्या.
भाजप सरकारच्या कार्यकाळात आज वैज्ञानिकांनी अंतराळ क्षेत्रात हे यश संपादित केलं आहे. मात्र भारतातील संरक्षण क्षेत्राचा पाया पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वात काँग्रेसने रचला असल्याचं काँग्रेसने दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 1962 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वात अंतराळातील कार्यक्रमांची रुपरेषा आखली गेली होती, असंही काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मिशन शक्ती'ची माहिती देशातील नागरिकांना दिली. मोदी म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."
"कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या
अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी