मुंबई : मणिपूरमधील (Manipur) थौबल येथून रविवार 14 जानेवारी रोजी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात  झाली. ही यात्रा सुरु होण्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तिथे उपस्थित असणाऱ्या जनतेला संबोधित केले. पण त्यावेळी त्यांनी सर्वात आधी तिथे उपस्थित असलेल्या लोकांची माफी मागितली. 


पण सध्या प्रश्न हा उपस्थित केला जातोय की, राहुल गांधींनी माफी का मागितली. तर दिल्लीतील धुक्यामुळे फ्लाईट उशीरा झाली, त्यामुळे राहुल गांधी यांना मणिपूरमध्ये पोहचायला उशीर झाला. लोक सकाळपासून राहुल गांधींच्या येण्याची वाट पाहत होते, पण त्यांना यायला संध्याकाळ झाली, त्यामुळे राहुल गांधी यांनी उपस्थितांची माफी मागितली. 


राहुल गांधी काय म्हटलं?


राहुल गांधी यांनी लोकांना संबोधित करताना म्हटलं की, दिल्लीत धुक्यामुळे आमच्या फ्लाइटला उशीर झाला. आम्हाला माहित आहे की तुम्ही लोक सकाळपासून आमची वाट पाहत आहात. तुम्ही लोक नाराज झालात, म्हणून मी तुमची माफी मागतो.


आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. यावर त्यांनी म्हटलं की, मणिपूरमध्ये भाऊ, बहिणी, आई-वडील मारले गेले, पण आजपर्यंत तुमचे अश्रू पुसण्यासाठी पीएम मोदी आले नाहीत, ही शरमेची बाब आहे. आम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरलो, आम्ही भारताला एकत्र आणण्यासाठी, द्वेष मिटवण्याबाबत  लाखो लोकांशी बोललो आणि त्यांच्या वेदना ऐकल्या."


आम्ही मणिपूरचं दु:ख समजू शकतो - राहुल गांधी


भाजपवर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर हा भाजप आणि आरएसएससाठी भारताचा भाग नाही.  आम्हाला मणिपूरच्या लोकांच्या वेदना समजतात. आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही या राज्यात शांतता प्रस्थापित करू. भारत जोडो यात्रा आम्ही सकाळी 6 वाजता सुरू व्हायची आणि 7 वाजता संपायची. आम्ही तुमचं बोलणं ऐकतोय, आम्ही तुम्हाला मन की बात ऐकवू इच्छित नाही, तर आम्हाला तुमच्यासोबत मिळून  बंधुभाव संपूर्ण भारतासमोर ठेवू इच्छितो. 


मणिपूर पहिल्यासारखं राहिलं नाही - राहुल गांधी 


मी 29 जून 2023 रोजी मणिपूरला आलो आणि त्या भेटीदरम्यान मी जे पाहिले आणि ऐकले ते यापूर्वी कधीही पाहिले किंवा ऐकले नव्हते. मी 2004 पासून राजकारणात आहे. पण मी पहिल्यांदाच पाहतोय की इथे सरकारच कोसळलं आहे.  ते मणिपूर आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


Congress : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात, 67 दिवस, 355 लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा