Rahul Gandhi On America Visit: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजप (BJP) नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पीएम मोदी जर देवासोबत बसले तर ते विश्व कसं चालतं, ते देवालाही समजावून सांगतील. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi News) मंगळवारी अमेरिकेत गेले. त्यावेळी त्यांनी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत देशाच्या राजकारणावर भाष्य करत भारतीय जनता पक्षासह आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. राजकारणासाठी ज्या गोष्टींची गरज भासते, त्या सर्व गोष्टींवर यांचं नियंत्रण आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. 


राहुल गांधी म्हणाले की, "मोदींना सगळं काही माहिती आहे. देवापेक्षाही जास्त त्यांना माहिती आहे. मला वाटतं मोदींना देवाशेजारी बसवलं तर ते देवालाही समजावून सांगतील की, हे जग कसं चालतं. देवही मोदींचं म्हणणं ऐकून गोंधळून जाईल की, मी नक्की काय निर्माण केलं आहे." 


"आपल्याला सर्वकाही येतं, असं समजणाऱ्या लोकांचा एक गट आहे. ते शास्त्रज्ञांना विज्ञान, इतिहासकारांना इतिहास, लष्कराला युद्धशास्त्र समजावून सांगू शकतात. पण खरं पाहिलं तर अशा लोकांना काहीच येत नाही.", राहुल गांधी म्हणाले. 


मला वाटलं होतं, भारत जोडो यात्रेचा प्रवास सोपा होणार नाही : राहुल गांधी


भारत जोडो यात्रेचा अनुभवही राहुल गांधींनी अमेरिकेत बोलताना सांगितला. ते म्हणाले की, "ही यात्रा सुरू झाली तेव्हा 5-6 दिवसांनी मला समजलं की, ही यात्रा सोपी असणार नाही. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणं खूप अवघड वाटत होतं, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक रोज 25 किलोमीटरचा पायी प्रवास करत होतो. तीन आठवड्यांनंतर मला जाणवलं मी अजिबात थकलेलो नाही. मी त्यावेळी माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांना विचारलं, तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय का? मात्र माझ्या प्रश्नाला कोणीही होकारार्थी उत्तर दिलं नाही. भारत जोडो यात्रेच्या प्रवासात केवळ काँग्रेसच नाही, तर संपूर्ण भारत पावलापावलानं पुढे जात होता."


राहुल गांधी पुढे म्हणाले, "काँग्रेसची चांगली गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांसोबत आहोत. कोणी येऊन काही बोलू इच्छित असेल तर आपण त्याचं ऐकतो. आम्हाला राग येत नाही, हा आमचा स्वभाव आहे." अमेरिकेत बोलताना राहुल गांधींनी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. अशी प्रश्नोत्तरांचं सत्र भाजपच्या सभांमध्ये होत नाही, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. 


राहुल गांधींना अमेरिकेतील भारतीय वंशांच्या लोकांनी विचारलेले प्रश्न


प्रश्न 1 : महिला सक्षमीकरण विधेयक प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे, भारतातील महिलांची सुरक्षा हा एक मोठा प्रश्न आहे.


राहुल गांधींचं उत्तर : महिला सक्षमीकरण विधेयकासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्हाला त्यांना आधीच्या सरकारमध्ये आणायचं होतं, परंतु आमचे काही मित्रपक्ष त्यासाठी तयार नव्हते, पण मला विश्वास आहे की, आम्ही आमच्या पुढच्या सरकारच्या काळात हे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. दुसऱ्या प्रश्नावर मी म्हणेन की, जर आपण महिलांना सत्ता दिली, त्यांना राजकारणात आणलं, त्यांना व्यवसायात स्थान दिलं तर त्या आपोआप सक्षम होतील. 


प्रश्न 2 : एक भाषा, एक संस्कृती, एक परंपरा, एक धर्म याबद्दल तुमचं काय मत आहे?


राहुल गांधींचं उत्तर : तुम्ही संविधान वाचलं तर तुम्हाला 'यूनियन ऑफ स्टेट' मिळेल. प्रत्येक राज्याची भाषा आणि संस्कृती जपली पाहिजे. तुम्ही जे बोलत आहात ते आमच्या संविधानात आहे. भाजप आणि आरएसएस या भारतावर हल्ला करत आहेत. माझं असं मत आहे की, तमिळ भाषा ही तमिळ लोकांची भाषा आहे. ती त्यांच्यासाठी भाषा नाही, ती त्यांची संस्कृती आहे, ती त्यांची जीवनपद्धती आहे. मी तमिळ भाषेच्या अस्तित्वाला कधीही धोका निर्माण होऊ देणार नाही. तमिळ भाषेचं अस्तित्व धोक्यात येणं म्हणजे, आडिया ऑफ इंडियाला ठेच पोहोचवणं आहे. कोणत्याही भाषेचं अस्तित्व धोक्यात येणं म्हणजे, भारताचं अस्तित्व धोक्यात येण्यासारखं आहे.