नवी दिल्ली : राहुल गांधींचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध, गरीबांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारकडून देशभरात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मात्र संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला आहे. राहुल गांधी ट्वीट करत म्हटलं आहे की, मागील वर्षी अनियोजित लॉकडाऊन करणं हा जनतेवर घातक वार होता. यामुळं मी संपूर्ण लॉकडाऊनच्या विरोधात आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, मात्र पंतप्रधान मोदी यांची नाकामी आणि केंद्र सरकारच्या शून्य रणनीतीमुळं देशाला पूर्ण लॉकडाऊनकडे ढकलत आहेत. अशा स्थितीत गरीब जनतेला आर्थिक पॅकेज आणि तत्काळ मदत देणं गरजेचं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.






राहुल गांधी यांनी बुधवारी ट्वीट करत पाच प्रश्न केले होते-


देशात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळं परिस्थिती गंभीर झाली आहे. स्थिती गंभीर  असताना भारताला अनेक देशांकडून मदत मिळत आहे. यामध्ये आर्थिक मदतीसह मेडिकलसंबंधी गोष्टी देखील मिळत आहेत. मात्र या मदतीवरुन राजकारण होत असल्याचं समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल केंद्र सरकारला विदेशांकडून मिळणाऱ्या मदतीवरुन प्रश्न विचारले होते. या मदतीचा फायदा कुणाला होत आहे? असा सवाल राहुल गांधींनी विचारला होता. 


1-विदेशातून कोविडसाठी किती मदत भारताला मिळाली?


2- ही मदत कुठे आहे?


3- या मदतीचा फायदा कुणाला होतोय?


4- कशा पद्धतीनं राज्यांमध्ये या मदतीचं वाटप केलं? 


5- यामध्ये पारदर्शकता का नाही?


देशात दररोज कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची भर पडत असताना आता यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आधीही टीका केली होती. देशात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर विजय मिळवल्याचं आधीच श्रेय घेत आहेत असं सांगत ते म्हणाले होते की, भारतातील कोरोना परिस्थितीवरून संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना मोदी सरकार मात्र आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या कामात व्यस्त आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.