नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानींवर हल्लाबोल करत आहेत, मात्र त्याचवेळी पक्षाचे नेते कपिल सिब्बल अनिल अंबानी यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात हजर राहून त्यांची बाजू मांडत आहेत. त्यांच्या या विरोधाभासी कृतीमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून नेटीझन्स त्यांना ट्रोल करत आहेत.
कोणत्या प्रकरणात सिब्बल अंबानींचे वकील?
एरिक्सन इंडियाने अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. याच प्रकरणात कपिल सिब्बल अनिल अंबानींचे वकील आहेत. कोर्टाच्या आदेशानंतरही अंबानींच्या कंपनीने 550 कोटी रुपये दिले नाहीत, असं एरिक्सन इंडियाने सुप्रीम कोर्टात सांगितलं. कपिल सिब्बल आणि मुकुल रोहतगी यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात अनिल अंबानींच्या बाजूने युक्तिवाद करत त्यांनी कोणत्याही प्रकारे कोर्टाचा अवमान केला नसल्याचं सांगितलं.
रिलायन्स कम्युनिकेशनने आमचे 1,500 कोटी रुपये दिलेले नाहीत, असा आरोप एरिक्सन इंडियाने केला आहे. 7.9 कोटी डॉलर एरिक्सन इंडियाला देण्याचा जो आदेश कोर्टाने दिला होता, त्याचं रिलायन्स कम्युनिकेशन्सने उल्लंघन केलं आहे. त्यामुळे मालक अनिल अंबानींना जेलमध्ये पाठवावं, असं एरिक्सन इंडियाने म्हटलं आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सवर एरिक्सन इंडियाचं एकूण 15.8 कोटी डॉलरचं कर्ज आहे. एरिक्सनच्या याचिकेनंतर आरकॉमने सुप्रीम कोर्टात 1.86 कोटी डॉलर जमा केले, जेणेकरुन अंशत: परतफेड होईल.
परंतु सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या काही वेळ आधीच कपिल सिब्बलने राफेल प्रकरणात मोदी सरकार आणि अनिल अंबानी यांच्याविरोधात ट्वीट केलं होतं. सिब्बल यांनी ट्विटरवर ई-मेल शेअर करत अनिल अंबानी यांच्यावर निशाणा साधला होता. या ई-मेलमध्ये अंबानींचा उल्लेख होता.
काँग्रेसचा आरोप काय?
"फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत सरकारी कंपनी एचएएलला वगळून अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सला कंत्राट दिलं. यामुळे अनिल अंबानींच्या कंपनीला 30 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. एकट्या पंतप्रधानांना राफेल कराराची माहिती होती आणि त्यांनी याबाबत अनिल अंबानींना सांगितलं. मोदींनी अनिल अंबानींच्या मध्यस्थाप्रमाणे काम केलं," असा आरोप काँग्रेसने केला आहे. "तसंच त्यांनी सरकारी गोपनीयता कायद्याचं उल्लंघन केलं आहे. हा देशद्रोह असून हेरच असं करतात", असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी अनिल अंबानीवर टीका करत आहेत, तर कपिल सिब्बल बचाव!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2019 12:20 PM (IST)
एरिक्सन इंडियाने अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. याच प्रकरणात कपिल सिब्बल अनिल अंबानींचे वकील आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -