Radhika Yadav Murder Case: हरियाणा येथील गुरुग्राममध्ये 25 वर्षीय महिला टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी शुक्रवारी (11 जुलै) मोठा खुलासा केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी वडील दीपक यादव यांनी त्यांच्या मुलीच्या हत्येची पूर्णपणे योजना आखली होती. हे रागाच्या भरात अचानक उचललेले पाऊल नव्हते. पोलिसांनी या प्रकरणाबद्दल माहिती देताना सांगितले की, गोळीबार होण्यापूर्वी अनेक आठवडे वडील आणि मुलीमध्ये अनेक वाद झाले होते, त्याची आम्ही चौकशी करत आहोत.
गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षीय दीपक यादव यांनी गुरुवारी (10 जुलै) सकाळी 10:30 वाजता त्यांची मुलगी राधिका यादव हिच्या पाठीत चार गोळ्या झाडल्या. राधिका त्यांच्या तीन मजली घराच्या स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना वडील दीपक यादवने मुलीवरती गोळ्या झाडल्या. पोलिसांनी सांगितले की, दीपकचे घर सुशांत लोक-2 च्या ब्लॉक-जी मध्ये आहे.
गुरुग्राम पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती दिली
गोळीबाराच्या घटनेचा खुलासा करताना गुरुग्राम पोलिस जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार म्हणाले, "चौकशीदरम्यान, आरोपी दीपक यादवने कबूल केले आहे की त्याने राधिकाला मारण्यापूर्वी संपूर्ण नियोजन केले होते." अधिकाऱ्याने सांगितले की, "सहसा तो सकाळी स्वतः दूध आणायला जायचा, पण गुरुवारी (10 जुलै) त्याने त्याच्या मुलाला पाठवले. यानंतर, जेव्हा तो राधिकासोबत घरात एकटाच होता, तेव्हा ती नाश्ता बनवत असताना त्याने तिच्यावर चार गोळ्या झाडल्या."
दीपक यादवच्या शेजाऱ्याचा दावा
दीपकच्या मूळ गावी वजीराबाद येथील एका जुन्या शेजाऱ्यानेही असा दावा केला की दीपक राधिकाच्या जीवनसाथीच्या निवडीमुळे नाराज होता. राधिकाला तिच्या जातीबाहेर लग्न करायचे होते, परंतु तिच्या वडिलांना तिने तिच्या जातीत लग्न करावे असे वाटत होते. शेजाऱ्याने असेही सांगितले की राधिकाचे वडील दीपक हे खूप जुन्या विचारांचे होते.
नेमकं प्रकरण काय?
हरियाणाच्या गुरुग्राम शहरातील एका उच्चशिक्षित कुटुंबात एका धक्कादायक घटनेने सगळ्यांना हादरवून टाकले आहे. टेनिसपटू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर राधिका यादव (वय 25) हिची तिच्याच वडिलांनी गोळी झाडून हत्या केली. ही घटना गुरुवारी (10जुलै) घडली असून, दीपक यादव या वडिलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राधिका ही बालपणापासून टेनिसमध्ये चांगली जादू दाखवत होती. तिच्या प्रशिक्षणासाठी वडिलांनी सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी तिला दुखापत झाल्याने तिचा स्पर्धात्मक करिअर थांबला. त्यानंतर तिने टेनिस कोचिंग सुरू केली आणि सोशल मीडियावरही इन्फ्लुएंसर म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिस चौकशीत दीपक यादव यांनी कबूल केलं की, गावातील लोकांचे सततचे टोमणे, मुलीच्या वर्तनावर टीका यामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाला होता. त्याला झोप लागत नव्हती आणि तो घरात एकटा बसून रागात असायचा. विशेषतः मुलीचे सोशल मीडियावरचे व्हिडीओ, कोचिंग सेंटर सुरू ठेवणे यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्यामुळे त्याने राधिकावर सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्याचा दबाव टाकला होता, आणि काही वेळात तिने ते बंदही केले. पण राधिका आपल्या कोचिंगबाबत ठाम होती.
राधिका ही केवळ एक टेनिसपटूच नव्हती, तर स्वतंत्र विचारांची, जिद्दी आणि प्रेरणादायक मुलगी होती. तिचं आयुष्य एका मानसिक तणावाखाली असलेल्या वडिलांच्या चुकीच्या कृतीमुळे संपुष्टात आलं. ही घटना केवळ एक कौटुंबिक शोकांतिका नसून, सामाजिक दबाव, मानसिक आरोग्य, आणि पिढीतील मतभेद यावर नव्याने विचार करायला लावणारी आहे.