नवी दिल्ली : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth Death II) यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रविवारी, 11 सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय दुखवटा (One Day State Mourning) जाहीर करण्यात आला असून या दिवशी सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही. 


 






ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी रात्री निधन झालं होतं. त्या 96 वर्षांच्या होत्या. 1952 साली त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे 70 वर्षांपर्यंत त्या राजसत्तेवर होत्या. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 


एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत. ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या. 


वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थामुळे एलिझाबेथ यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. फार मोजक्याच कार्यक्रमात त्या उपस्थित राहत होत्या. वयोमानामुळे त्यांच्या शारिरीक हालचालींवरही बंधने आली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांचे निधन झालं.