Punjab : भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपानंतर मंत्रिमंडळातून हलालपट्टी करण्यात आलेल्या पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगला (Punjab Health Minister Vijay Singla) यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंगला यांना अटक केली आहे. 


नोकरीचे कंत्राट देण्यासाठी एक टक्का कमिशनची मागणी केली असल्याचा आरोप विजय सिंगला यांच्यावर करण्यात आला आहे. सिंगला यांच्याविरोधात लाच मागितल्याचे पुरावे देखील मिळाले आहेत. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे भगवंत मान यांनी त्यांची मंत्रीमडळातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर थोड्याचवेळात सिंगला यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. भगवंत मान यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.  


मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटले आहे की, आम आदमी पक्ष एका पैशाचाही भ्रष्टाचार सहन करणार नाही, मग तो आमच्या पक्षातील असेल किंवा बाहेरील.  भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून आमच्या पक्षाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास कायम ठेवण्याची जाबाबदारी आमच्यावर आहे. विजय सिंगला यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. भगवंत मान यांनी एक व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. 






अरविंद केजरीवाल यांच्याकडून कौतुक
विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हलालपट्टी करण्यात आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे कौतुक केले आहे. "भगवंत तुमचा अभिमान आहे. तुमच्या कृतीने माझ्या डोळ्यात पाणी आले आहे. आज संपूर्ण देशाला आपचा अभिमान वाटतो, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. <



 
विजय सिंगला यांच्याकडून गुन्ह्याची कबुली
दरम्यान, मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर विजय सिंगला यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. "आरोग्य मंत्री विजय सिंगला यांनी आपल्या खात्यात भ्रष्टाचार केला असून त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती भगवंत मान यांनी दिली आहे.