नवी दिल्ली : पुण्यातील सर्वेश नावंदेला वायूदल विंगच्या सर्वोत्कृष्ट कॅडेटचं सुवर्णपदक मिळालं आहे. 'पंतप्रधान रॅली'त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वेशला सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं.


एसीसीच्या श्रेणी अंतर्गत सर्वेश सुभाष नावंदेला वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेट होण्याचा बहुमान मिळाला. सर्वेश 19 वर्षांचा असून पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बी.एस.सीच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे.



प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी सहभागी होण्यासाठी त्याने पुण्यातून नाव नोंदवलं होतं. नोव्हेंबरमध्ये पुणे विभागातून त्याची निवड औरंगाबादमधील पुढील शिबीरासाठी झाली. यानंतर एनसीसी शिबीरामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तो उत्तीर्ण होत गेला आणि पंतप्रधान रॅलीसाठी पात्र ठरला.



दिल्लीतील छावणी भागातील करीअप्पा परेड ग्राउंडवर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी पंतप्रधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेना प्रमुख बिरेंद्रसिंग धनोआ, नौसेना प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा उपस्थित होते

.