पुणे : गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावला आहे. या मोहीमेदरम्यान गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांसह 30 आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांनी माऊंट कांचनजुंगावर चढाई केली. आज (15 मे) सकाळी दहाच्या सुमारास गिर्यारोहकांनी शिखर सर केलं. कांचनजुंगा इको इक्स्पेडिशन 2019 ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात पहिली यशस्वी नागरी मोहीम आहे. एकाच दिवशी 30 गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर एकाच दिवशी चढाई करणं हा नवा विक्रम आहे.

गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. या आधी 2012 मध्ये माऊंट एव्हरेस्ट, 2013 मध्ये माऊंट ल्होत्से, 2014 मध्ये माऊंट मकालू, 2016 मध्ये माऊंट धौलागिरी आणि माऊंट च्यो ओयु आणि 2017 मध्ये माऊंट मनास्लुवर मोहीम फत्ते केली होती. अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक मोहीम नेते आहेत.

आंतरराष्ट्रीय मोहिमेचे बेस कॅम्पवरुन नेतृत्व आणि संयोजन झिरपे यांनी केलं. गिरीप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी शिखराची चढाई केली.

ज्येष्ठ गिर्यारोहक माया शेर्पा आणि सिंगापूरचे खु स्वी चाऊ यांनीही उमेश झिरपे यांच्या मोहिमेदरम्यान शिखर चढाई केली होती.

कसं आहे माऊंट कांचनजुंगा शिखर?

उंची : 8586 मीटर
माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट K2 नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचं शिखर
भारतातील सर्वात उंच शिखर
हे शिखर भारत आणि नेपाळच्या सीमेवर आहे

कांचनजुंगाची पाच शिखरं

मुख्य शिखर : 8586 मीटर
पश्चिम शिखर : 8505 मीटर
मध्य शिखर : 8482 मीटर
दक्षिण शिखर : 8494 मीटर
कांगबाचेन शिखर : 7903 मीटर

चढाईचे मार्ग

भारतीय बाजूचा मार्ग : कांचनजुंगा आणि झेमू ग्लेशियरच्या बाजूने (सध्या बंद)
नेपाळच्या बाजूचा मार्ग : यालुंग ग्लेशियरच्या मार्गे (गिरीप्रेमीच्या संघाने याच मार्गाने चढाई केली)

चढाईतील आव्हानं

नेपाळ बाजूच्या यालुंग ग्लेशियर मार्गे चढाई करण्यात येते
बेसकॅम्पची उंची : 5475 मीटर
कॅम्प 1 ची उंची : अंदाजे 6000 मीटर
कॅम्प 2 ची उंची : अंदाजे 6300 मीटर
कॅम्प 3 ची उंची : अंदाजे 6900 मीटर
कॅम्प 4 ची उंची : अंदाजे 7500 ते 7700 मीटर

बेसकॅम्प ते कॅम्प 1 मार्ग : तीव्र बर्फाळ रिज

कॅम्प 1 ते कॅम्प 2 मार्ग : ब्लू आईस (टणक बर्फ ज्यावरुन चालणं आणि चढाई करणे अत्यंत अवघड) तसंच 100 मीटरची बर्फाची 70 ते 80 अंश कोनातील उभी भिंत

कॅम्प 2 ते कॅम्प 3 : दगडी भिंती, चढाई मोहिमेतील सर्वाधिक मृत्यू याच टप्प्यात

कॅम्प 3 ते कॅम्प 4 : प्रचंड हिमभेगा, सतत हालचाल होणारा भाग

कॅम्प 4 ते शिखरमाथा : कॅम्प 4 ते शिखरमाथा ते पुन्हा कॅम्प 4 हा प्रवास तब्बल 24 ते 27 तासांचा, अत्यंत थकवणारा, माऊंट एव्हरेस्टवर याच टप्प्यांमध्ये चढाई - उतराईसाठी तुलनेने कमी म्हणजे 14 ते 17 तास लागतात.