नवी दिल्ली : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. दहशतवाद्यांना पाकिस्तान सातत्याने पाठिशी घालत असल्याने भारतात पाकिस्तानविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकार राजकीय आणि लष्करी पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारतीय नागरिकही भारत सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीयांनी पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका दिला आहे. 'डीस्पोर्ट' या क्रीडा वाहिनीने पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सामन्यांचं भारतात प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटला मोठा दणका बसला आहे.

भारताच्या आयपीएलला कॉपी करत पाकिस्तानमध्ये 'पाकिस्तान सुपर लीग' ही स्पर्धा खेळवली जाते. पीएसएलच्या प्रसारणाचे हक्क 'डीस्पोर्ट' या वाहिनीकडे आहेत. पीएसएलचे आधीचे दोन सीझन भारतात केवळ संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आले होते. 2018 मध्ये डीस्पोर्टने या पीएसएलच्या प्रसारणाचे हक्क मिळविले होते. परंतु पुलवामा येथील हल्ल्यानंतर डीस्पोर्टने सुपर लीगला भारतात ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानी क्रिकेटला जबर झटका बसला आहे.

डीस्पोर्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधला. त्यामध्ये ते म्हणाले की, पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण आम्ही थांबवले आहे. राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्हीदेखील संवेदनशील आहोत. पुलवामा हल्ल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत.

जगभर गाजत असलेल्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये(आयपीएल)पाकिस्तानी खेळाडूंवर फार पूर्वीच बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलला कॉपी करत पाकिस्तानने पीएसएल सुरु केलं. परंतु पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजशिवाय दुसऱ्या कोणत्याही देशात पीएसएलची चर्चासुद्धा झाली नाही.

पीएसएलला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी या लीगचे भारतात प्रसारण व्हावे यासाठी पाकिस्तानने खूप प्रयत्न केले होते. अखेर मागच्या वर्षी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. परंतु आता पीएसएलचं भारतातलं प्रक्षेपण बंद झाल्याने पाकिस्तानी क्रिकेटला मोठा दणका बसला आहे.