पुद्दुचेरी : पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत आलं आहे. आज घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीत मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. विधानसभेत बहुमत चाचणीच्या आधीच काँग्रेस आमदारांनी सभात्याग केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की, मुख्यमंत्री सदनामध्ये बहुमत सिद्ध करु शकले नाहीत. काँग्रेस सरकार फ्लोर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करु शकले नाही.


विधानसभेमध्ये मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांनी म्हटलं की, माजी उपराज्यपाल किरण बेदी आणि केंद्र सरकारनं विरोधी पक्षांसोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या एकजुटीमुळं आम्ही मागील पाच वर्षांपासून सरकार चालवत आहोत. केंद्र सरकारने आम्हाला फंड न देता पुद्दुचेरीतील जनतेला धोका दिला आहे, असं मुख्यमंत्री नारायणसामी यांनी म्हटलं आहे.


मागील काही दिवसांपूर्वी चार आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता काँग्रेस आमदार लक्ष्मीनारायण यांनीही राजीनामा दिल्यानं ही संख्या पाचवर पोहोचली होती. तसेच सहयोगी पक्ष डीएमकेच्या आमदारांनीही राजीनामा दिल्यानं नारायणसामी सरकार अल्पमतात आलं होतं. 33 सदस्यीय विधानसभेमध्ये या राजीनाम्यांमुळं सत्ताधारी काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या ही 11 वर आली आहे. इथे सत्तास्थापनेसाठी 17 सदस्यांची आवश्यकता आहे. आता विरोधी पक्षांकडील आमदारांची संख्या 14 झाली आहे.


कालच काँग्रेस आमदार लक्ष्मीनारायणन आणि द्रमुक आमदार वेंकटेशन यांनी विधानसभा अध्यक्ष वी. पी. शिवकोलुंधु यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर लक्ष्मीनारायणन यांनी नारायणसामी सरकारनं बहुमत गमावलं असल्याचं सांगितलं.


आता काँग्रेसनं बहुमत सिद्ध न केल्यामुळं पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. पुढच्या काही महिन्यात पुद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.