Belgaum News : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) तसेच नितीन बानुगडे पाटील (Nitin Banugade Patil) यांनी आज खानापूर कोर्टात हजेरी लावली. समितीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी दोघांनी खानापूर कोर्टात हजेरी लावली.


बेळगाव येथे झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 26 ऑक्टोबर 2006 रोजी खानापूर शहरातील ताराराणी हायस्कूलच्या मैदानावर युवा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत कर्नाटक सरकारच्या वतीने पोलिसांनी महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि वक्ते नितीन बानुगडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज दोन्ही नेत्यांनी खानापूर न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली. 


उभयतांच्या जामिनात न्यायालयाने (Khanapur Court) वाढ केली असून पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या दोघांच्या वतीने बेळगावचे वकील शामसुंदर पत्तार आणि हेमराज बेंचनावर यांनी काम पाहिले. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मुरलीधर पाटील, यशवंत बिरजे, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, रूकमाना झुंजवाडकर, नारायण कापोलकर आदी उपस्थित होते.


रामदास कदम यांना तब्बल सोळा वर्षानंतर एप्रिल महिन्यात जामीन


2006 मध्ये खानापूर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांना तब्बल सोळा वर्षानंतर एप्रिल महिन्यात जामीन मिळाला होता. खानापूरमध्ये रामदास कदम यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. रामदास कदम यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाने खानापूर येथील समितीच्या मेळाव्यात साडेतीनशे जणांच्या जमावाने केलेला पोलिसांवर हल्ला, सरकारी गाड्यांची मोडतोड केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 153 आणि 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


याआधी कधीही तारखेला हजर झाले नव्हते या केसमध्ये त्यांच्यावर कोर्टाने समन्स बजावले होते. खेड येथील त्यांच्या घरावर कोर्टाने मालमत्ता जप्तीचे नोटीस काढले होते. त्यानंतर त्यांच्या भावाने मुंबईत कल्पना दिल्यानंतर कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या