Prophet Muhammad Row : इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हैदराबादमधील आमदार टी. राजा (MLA T Raja) यांना भाजपमधून (BJP) निलंबित करण्यात आले आहे. टी राजा (MLA T Raja) यांना भाजपमधून (BJP) का काढू नये? याबाबत 10 दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्यास पक्षाकडून सांगण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंगळवारी टी. राजा यांना अटक (MLA T Raja) करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांना भाजपनं पक्षातून निलंबित केले आहे.
टी. राजा (MLA T Raja) यांच्यावर आरोप काय?
कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या निषेधार्थ प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप टी. राजा (MLA T Raja) यांच्यावर करण्यात आला आहे. त्याचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर टी. राजा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
टी. राजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा हैदराबादमध्ये शो होणार होता. या शोला टी. राजा यांनी विरोध केला. तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी मुन्नावर फारुखीला परवानगी दिल्यास त्याच्याकडून वादग्रस्त टिप्पणी होण्याची शक्यता आहे. फारुकी आपल्या कॉमेडी शोमध्ये हिंदू देवतांबाबत वादग्रस्त टिप्पणी करतात असेही राजा यांनी म्हटले. मुनव्वर फारुकीचा शो 20 ऑगस्ट रोजी होणार होता. त्याच्या शोला आधी विरोध करताना टी राजा सिंह यांनी यांनी म्हटले होते की 'जर मुनव्वरचा कार्यक्रम झाला तर आम्ही तिथे जाऊन त्याला मारु.'
असदुद्दीन ओवेसींचा भाजपवर निशाणा -
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणानंतर भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'भाजप आमदाराने केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. भाजपला तेलंगणातील शांतता बिघडवायची असून सांप्रदायिक हिंसा घडवायची आहे.' टी. राजा यांच्या वक्तव्याचा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी निषेध व्यक्त करणार का? असा सवालही यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.
टी राजा यांनी याआधीही केलेत वादग्रस्त वक्तव्य -
आमदार टी. राजा यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. त्यांनी अनेकदा अतिउजवा हिंदुत्ववादी भूमिकेचा पुरस्कार केला आहे. टी. राजा सिंह हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.