BJP MLA Arrested : इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे हैदराबादमधील आमदार टी. राजा (BJP MLA T. Raja Arrested) यांना अटक करण्यात आले आहे. कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या निषेधार्थ प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप टी. राजा यांच्यावर करण्यात आला आहे. त्याचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली होती.


हैदराबाद दक्षिण क्षेत्रातील डीसीपी पी. साई चैतन्य यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजा यांच्यावर कारवाई करावी यासाठी निर्दशने करण्यात आली होती. राजा यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर हैदराबादमधील दबीरपुरा भवानी नगरमध्ये निर्दशने करण्यात आली. यामध्ये एमआयएमचे नेतेदेखील सहभागी झाले होते. त्याशिवाय इतर ठिकाणी स्थानिक पातळीवरही टी. राजा यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. 






टी. राजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा हैदराबादमध्ये शो होणार होता. या शोला टी. राजा यांनी विरोध केला. तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी मुन्नावर फारुखीला परवानगी दिल्यास त्याच्याकडून वादग्रस्त टिप्पणी होण्याची शक्यता आहे. फारुकी आपल्या कॉमेडी शोमध्ये हिंदू देवतांबाबत वादग्रस्त टिप्पणी करतात असेही राजा यांनी म्हटले. मुनव्वर फारुकीचा शो 20 ऑगस्ट रोजी होणार होता. त्याच्या शोला आधी विरोध करताना टी राजा सिंह यांनी यांनी म्हटले होते की 'जर मुनव्वरचा कार्यक्रम झाला तर आम्ही तिथे जाऊन त्याला मारु. कार्यक्रमाचे तिकीट आमचे कार्यकर्ते विकत घेतली आणि पुढे काय होईल ते तुम्हाला माहित आहे.' असा इशाराही दिला होता.


वादग्रस्त वक्तव्यांसाठी राजा यांची ओळख


आमदार टी. राजा हे वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यांसाठी ओळखले जाते. त्यांनी अनेकदा अतिउजवा हिंदुत्ववादी भूमिकेचा पुरस्कार केला आहे. टी. राजा सिंह गे हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.