नवी दिल्ली : देशातील नऊ मोठ्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीत घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील प्रॉपर्टी खरेदी-विक्रीबाबतची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 4 टक्के घट पाहायला मिळत आहे.


प्रोप टायगर डॉट कॉमने मुंबई, पुणे, नोएडा, गुरुग्राम, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि अहमदाबाद या नऊ मोठ्या शहरातील घरांच्या खरेदी-विक्रीचा अभ्यास केला आहे. त्यानंतरच घर खरेदीत घट झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. प्रोप टायगर डॉट कॉम एलारा टेक्नोलॉजीचा भाग आहे. हाऊसिंग डॉट कॉम आणि मकान डॉट कॉमही एलारा टेक्नोलॉजीच्यात अंतर्गत येतात.

“2017-18 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील 9 मोठ्या शहरांमध्ये 53 हजार 352 घरांची विक्री झाली. याआधीच्या तिमाहीत 3 टक्क्यांनी वाढ असली, तरी नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीचा परिणामही गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत पाहायला मिळाला. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत 4 टक्क्यांनी घट पाहायला मिळाली.”, अशी प्रोप टायगर डॉट कॉमने माहिती दिली.

गुरुग्राममध्ये एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत काही अंशी घट होऊन 2 हजार 802 घरांच्या विक्रीची नोंद झाली. गेल्या वर्षीय गुरुग्राममध्ये पहिल्या तिमाहीत 2 हजार 908 घरांच्या विक्रीची नोंद आहे.

नोएडामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 3 हजार 565 घरांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी याच तिमाहीत 5 हजार 202 घरांची विक्री झाली होती.

याच पोर्टलच्या माहितीनुसार, घरांचे दर एक टक्के इतक्या किरकोळ वाढीने स्थिर झाले आहेत. हैदराबाद आणि बंगळुरु वगळता सर्व शहरात गेल्या तीन वर्षात प्रॉपर्टीच्या दरांमध्ये स्थिरता आहे.