PM Narendra Modi : गोध्रा हत्याकांडांची (Godhra Hatyakanda) घटना ही अकल्पनीय शोकांतिका असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी व्यक्त केले. त्यावेळी केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार होते. त्यांनी खोट्या खटल्यांमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे प्रयत्न असूनही न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केले तसेच आरोपींना शिक्षा झाली असल्याचे मोदी म्हणाले. 


2002 च्या दंगलीपूर्वीच्या घटना जाणून घेणं महत्त्वाचं


2002 च्या दंगलीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दंगलीपूर्वीच्या घटना जाणून घेणे महत्त्वाचं आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडू ते दिल्लीला जाणारे विमान अपहरण करून कंदहारला नेण्यात आले. 2000 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला होता. ऑक्टोबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला होता. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता, असे मोदी म्हणाले. हे जागतिक स्तरावरील दहशतवादी हल्ले होते, ज्याने जागतिक अस्थिरतेची ठिणगी पेटवल्याचे मोदी म्हणाले.


 2002 पूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली 


या सर्व घटना घडत असताना मी 7 ऑक्टोबर 2001 रोजी मी गुजरातचा मुख्यमंत्री होणार होतो. 24 फेब्रुवारी 2002 ला मी पहिल्यांदा आमदार झालो. माझे सरकार 27 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार होते, तेव्हा आम्हाला गोध्रा रेल्वे दुर्घटनेची माहिती मिळाली. ही अत्यंत गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. आधीच्या सगळ्या घटनांनंतर परिस्थिती कशी असेल याची तुम्ही कल्पना करु शकता. 2002 पूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली झाल्या होत्या असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


2002 नंतर गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1969 ची दंगल 6 महिने चालली होती. त्यावेळी विरोधी पक्ष सत्तेत होता आणि त्यांनी आमच्यावरच्या या खोट्या केसेसमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आरोपींना शिक्षा झाली आहे. 2002 पूर्वी गुजरातमध्ये सातत्याने दंगली होत होत्या, मात्र 2002 नंतर कोणतीही मोठी घटना घडली नाही असे पंतप्रधान म्हणाले. 


गुजरातमधील गोध्रा हत्याकांड प्रकरण नेमकं काय?


गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. साबरमती ट्रेनच्या S-6 या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने ३१ जणांना दोषी ठरवलं होतं, तर 63 जणांना निर्दोष मुक्त केलं. आरोपींपैकी 11 जणांना फाशी, तर 22 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरोपींना दिलेली शिक्षा कमी आहे, निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी गुजरात सरकारने केली होती. तर आपल्याला अजून न्याय मिळाला नसल्याचं आरोपींनी म्हटलं होतं.


महत्वाच्या बातम्या:


Sanjay Raut: नरेंद्र मोदी जाताना देशाचे तुकडे करतील, भारताचा प्रवास 'हिंदू पाकिस्तान'च्या दिशेने; संजय राऊतांची खरमरीत टीका