Indigo Airlines: दिव्यांग व्यक्तीला विमानात बसण्यास नकार दिल्याबद्दल एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने इंडिगो एअरलाइन्सवर मोठी कारवाई केली आहे. इंडिगोने 7 मे रोजी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले. यावर कडक कारवाई करत DGCA ने कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
डीजीसीएनेही या घटनेबाबत कंपनीला फटकारले आहे. याबाबत बोलताना डीजीसीएने म्हटले आहे की, कंपनीचे ग्राउंड स्टाफ एका अपंग मुलाला नीट हाताळू शकले नाहीत. उलट त्यांनी परिस्थिती आणखी बिघडवली. या प्रकरणात त्यांना अधिक संवेदनशीलपणे वागायला हवे होते. मुलाशी सहानुभूतीने वागायला हवे होते, जेणेकरून तो शांत झाला असता. असे केले असते तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रवाशाला विमानात बसवण्यास नकार देण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले नसते.
या प्रकरणी डीजीसीएने विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. प्रथमदर्शनी हे प्रकरण प्रवाशांशी गैरवर्तनाचे असल्याचे आढळून आले. डीजीसीएच्या नोटीसला एअरलाइन्सला 26 मे 2022 पर्यंत प्रतिसाद द्यायचा होता. डीजीसीएने या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती आणि एका आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितलं होत.
विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनीने काय सांगितलं...
रांची विमानतळावर एका अपंग मुलाला इंडिगोच्या विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. यानंतर विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी या दोघांकडून स्पष्टीकरण आले. विमानतळ प्राधिकरणाने इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा हवाला देत सांगितले की, हा अपंग मुलगा खूप घाबरलेला आणि आक्रमक झाला होता. यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. ग्राउंड स्टाफ शेवटच्या क्षणापर्यंत तो शांत होण्याची वाट पाहत होता. पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्याला विमानात चढण्यापासून रोखण्यात आलं.
IndiGo सर्वात मोठी एअरलाइन्स
इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. स्वस्त उड्डाण सेवा आणि समयसूचकता ही कंपनीची ओळख आहे. देशांतर्गत विमान वाहतूक बाजारात कंपनीचा वाटा 50% पेक्षा जास्त आहे. कंपनीच्या ताफ्यात 200 हून अधिक विमाने आहेत. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवर आपली सेवा पुरवते.