मुंबई: भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी शरद पवारांना या निवडणुकीत उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फोल झाला आहे. विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्याची माहिती आहे. उद्या दिल्लीत होणार्‍या 22 विरोधी पक्षांच्या बैठकीआधी ही महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी या आज 6 जनपथ या शरद पवारांच्या निवासस्थानी आल्या होत्या. उद्या दिल्लीत ममता बॅनर्जी यांनी 22 पक्षांची बैठक बोलावली आहे, त्याआधी त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार हेच विरोधकांचे उमेदवार असावेत अशी इच्छा आम आदमी पक्षाचे संजय सिंह, शिवसेनेचे संजय राऊत आणि डाव्या पक्षाच्या सीताराम येचुरी या सगळ्यांनी व्यक्त केली होती. 


राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान
पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. 


ममतांनी बोलावली 15 तारखेला बैठक
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधकांची 15 जून रोजी बैठक बोलावली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली ही बैठक एकतर्फी असल्याचे इतर पक्षांनी म्हटले. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे व इतर पक्षांनी याआधीच 15 जून रोजी बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. 


ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली ही बैठक एकतर्फी आहे, अशा प्रकारचा प्रयत्न हा राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधकांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना धक्का लावण्यासारखे असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी म्हटलं. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची एक बैठक या आधीच निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीवर इतर पक्ष नाराज आहेत. इतर वरिष्ठ नेत्यांना डावलून स्वत: ला भाजपविरोधी आघाडीचा चेहरा असल्याचे दाखवण्याचा ममता यांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकीच्या तारखेबाबत झालेल्या चर्चेचा भाग नव्हत्या. तरीदेखील त्यांना बैठकीची माहिती कशी मिळाली, याबाबत काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.