नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. खुद्द अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, “पंजाबमधील लोकांच्या हितासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक!” पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी प्रशांत किशोर यांची निवड केल्याचे बोलले जात आहे.


निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची टीम 'आय-पॅक' सध्या पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूच्या डीएमकेच्या निवडणूक प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहे.


यापूर्वी प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी काम केलं आहे.




पश्चिम बंगालमध्ये भाजप दोन आकड्यांमध्येच विजयी होईल, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. त्यांनी रविवारी ट्विट केले की, राज्यातील जनतेची इच्छा आहे की त्यांची मुलगी पुन्हा सत्तेवर यावी आणि 2 मे रोजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी लोकांनी हे ट्विट काढून पाहावे.


"भारतात लोकशाहीसाठी महत्वाची लढाई पश्चिम बंगालमध्ये लढली जात असून बंगालची जनता आपला संदेश देण्यास तयार आहे. हे माझे ट्विट २ मे पर्यंत ठेवा.", असे ट्विट प्रशांत किशोर यांनी केलं आहे.