Prashant Kishor on BJP : सध्या देशातील राजकीय वर्तुळात निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच ते राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये जाण्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती. परंतू ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. सध्या बिहारवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेह त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांना प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचा सर्वात यशस्वी नेता कोण असू शकतो? असा सवाल केला. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतले.
योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अमित शाहा जास्त ताकदवान
यावेळी प्रशांत किशोर यांना भाजपपासून, काँग्रेस आणि जेडीयूपर्यंत विविध प्रश्न विचारण्यात आले. पण रॅपिड फायर राऊंडमध्ये जेव्हा प्रशांत किशोर यांना विचारण्यात आले की, मोदींनंतर भाजपचा सर्वात यशस्वी नेता कोण असू शकतो? तर या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेतले. ते म्हणाले की, आजच्या तारखेला अमित शाह हेच मोदीनंतर यशस्वी नेता असू शकतात. मात्र, यावेळी प्रशांत किशोर यांना योगी आदित्यनाथ यांचा देखील पर्याय देण्यात आला होता.
काँग्रेससोबत मतभेद का झाले?
प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. कारण प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट देखील घेतली होती. तसेच काँग्रेसला सक्षम करण्यासाठी ब्लू प्रिंट देखील दिली होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस पक्षात सरचिटणीस पदासाठी इच्छुक ते आहेत का? असा देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सध्याच्या काँग्रेसच्या घटनेनुसार सर्व कामे करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मी काँग्रेसमध्ये काही आवश्यक बदल सुचवले होते जे पक्षाने मान्य केले नसल्याचेही ते म्हणाले.
प्रशांत किशोर राजकीय नेता होणार का? असाही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, मी बिहारमध्ये पदयात्रा काढणार आहे. त्यानंतरच निर्णय घेणार आहे. मी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर सांगितले होते की, मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार नाही. त्यानंतर मी एक वर्षाचा वेळ गेतला आहे. त्यानंतर आता बिहारमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मी प्रथम तेथील जनतेशी संवाद साधणार आहे. त्यानंतरच माझा पुढील निर्णय घेणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.