नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्या एका वक्तव्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. '2004 साली सोनिया गांधींनी माझी पंतप्रधानपदी निवड केली. पण माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी हे त्या पदासाठी अधिक योग्य होते.' असं वक्तव्य मनमोहन सिंह यांनी करताच उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या.


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या 'द कोलिशन इयर्स 1996-2012' या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. काल (शुक्रवार) पार पडलेल्या या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.


या कार्यक्रमात बोलताना मनमोहन सिंह म्हणाले की, 'मी राजकारणात अपघातानं आलो होतो. पण प्रणव मुखर्जी हे अगदी ठरवून राजकारणात आले होते. 2004 साली जेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान म्हणून माझी निवड केली त्यावेळी मला माहित होतं की, प्रणव मुखर्जी हे त्या पदासाठी अधिक योग्य आहेत. पण त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यावेळी जर प्रणब मुखर्जी यांनाही असंच वाटत असेल तर त्यात काहीही गैर नाही.'

यावेळी बोलताना मनमोहन सिंह यांनी प्रणव मुखर्जी यांचं बरंच कौतुकही केलं. प्रणब मुखर्जी हे प्रत्येक वेळेस सहकार्य करायचे हे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.  2004 साली जेव्हा यूपीएचं सरकार आलं त्यावेळी प्रणव मुखर्जी हे काँग्रेसमधील एक वरिष्ठ आणि अनुभवी नेते होते. त्यामुळे तेच पंतप्रधानपदाचे सर्वात मोठे दावेदारही होते. पण असं म्हटलं जातं की, सोनिया गांधी आणि त्यांचे पती राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात काही घटनांमुळे सोनियांनी प्रणव मुखर्जींऐवजी मनमोहन सिंह यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. ज्यानंतर प्रणव मुखर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात अनेकदा खटकेही उडाले होते.

'द कोलिशन इयर्स 1996-2012' या पुस्तकात प्रणव मुखर्जी यांनी 1996च्या संयुक्त मोर्चा सरकारपासून यूपीए-2च्या कार्यकाळापर्यंतच्या सर्व राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आहे.

या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला कम्युनिस्ट पक्षाचे नेते  सीताराम येचुरी, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह यूपीएतील अनेक नेते उपस्थित होते.

संंबंधित बातम्या :
2019 ला मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या हातात ब्रम्हास्त्र?