लोकसभेत साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शपथविधीवरुन विरोधकांचा गोंधळ
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2019 08:26 PM (IST)
साध्वी प्रज्ञा सिंह शपथ घेण्यासाठी दाखल होताच संस्कृत भाषेत शपथ घेण्यास सुरुवात केली. मात्र साध्वी यांनी घेतलेल्या नावावरुन विरोधकांपासून लोकसभा अध्यक्षही बुचकुळ्यात पडले.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचं पहिलं अधिवेशन आणि 17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात शपथविधी सोहळ्यात गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. भोपाळमधून निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी संस्कृतमध्ये शपथ घेण्यास सुरुवात केली आणि त्यावरचं विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. साध्वी प्रज्ञा सिंह शपथ घेण्यासाठी दाखल होताच संस्कृत भाषेत शपथ घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी आपल्या नावाचा उच्चार करताच विरोधकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी संस्कृतमध्ये ‘मैं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी लोकसभा सदस्य के रूप में” अशी सुरुवात करत शपथ घेण्यास सुरुवात केली असता विरोधकांनी जोरदार विरोध करत त्यांना थांबवण्यास भाग पाडलं. Sadhvi Pragya | साध्वी प्रज्ञा सिंहच्या शपथविधीवेळी लोकसभेत विरोधकांचा गोंधळ | ABP Majha केवळ स्वत:च्याच नावाचा उल्लेख व्हावा अशी मागणी विरोधकांनी केली. साध्वी यांनी घेतलेल्या स्वतःच्या नावावरुन विरोधकांपासून लोकसभा अध्यक्षही बुचकुळ्यात पडले. लोकसभेतील अधिकाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना वडिलांचं नाव घेण्यास सांगितले. त्यानंतर साध्वी यांनी दुसऱ्यांदा पुन्हा शपथ घेण्यास सुरुवात केली पण पुन्हा विरोधकांनी गोंधळ घालून साध्वी प्रज्ञा यांना थांबवण्यास भाग पाडलं. अखेर तिसऱ्या वेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पूर्ण शपथ घेतली.