गुरुग्राम : गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी सरकारने मोठी कारवाई केली आहे. शाळेचे समन्वयक जेईस थॉमस आणि रायन ग्रुपच्या उत्तर भारत विभागाचे प्रमुख फ्रान्सिस थॉमस यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जेजेए कायद्याच्या कलम 75 अंतर्गत या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.


तर दुसरीकडे रायन इंटरनॅशनल ग्रुपचे सीईओ रायन पिंटो यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला आहे. यावर उद्या सुनावणी होईल. त्यामुळे उद्या त्यांना जामीन मिळतो की अटक होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. रायन इंटरनॅशनल ग्रुपचं मुख्यालय मुंबईत आहे.

वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची नोटीस
प्रद्युम्नच्या वडिलांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, हरियाणा सरकार, सीबीआय, सीबीएसई आणि रायन स्कूलला नोटीस जारी केली आहे. "हा फक्त एका मुलाचा नाही तर संपूर्ण देशातील मुलांचा प्रश्न आहे," असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तीन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

प्रद्युम्नच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करावी, जेणेकरुन सत्य समोर येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या
गुरुग्राममध्ये शुक्रवारी सकाळी सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाची शाळेच्याच बस कंडक्टरने गळा चिरुन हत्या केली. हत्येपूर्वी बस कंडक्टरने प्रद्युम्नच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला होता. आरोपी कंडक्टर अशोक कुमारने हत्येची कबुली दिली आहे. परंतु या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही.

शाळेची भूमिका संशयास्पद
मात्र या संपूर्ण प्रकरणात रायन इंटरनॅशनल स्कूलची भूमिका मोठी संशयास्पद आहे. प्रद्युम्न हत्या प्रकरणाच्या तपासासाठी तपास यंत्रणा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. उत्तर विभागात रायन इंटरनॅशलनच्या 23 शाळा आहेत. त्यापैकी दिल्ली एनसीआरमधील 11 शाळांचा समावेश आहे.

पोलिसांवरही कारवाई
या प्रकरणात पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. रायन इंटरनॅशनल स्कूल ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतं, त्याच्या पोलिस इन-चार्जचं निलंबन केलं आहे. पालक आणि मीडियावर लाठीचार्ज केल्याने ही कारवाई केली आहे.

मुख्यमंत्र्यांचं प्रद्युम्नच्या पालकांना आश्वासन
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज प्रद्युम्नच्या वडिलांशी फोनवरुन बातचीत केली. ज्या यंत्रणेकडून किंवा हवा तसा तपास करायचा असेल, तशा तपासासाठी आम्ही तयार आहोत. यावर प्रद्युम्नच्या वडिलांनी मुख्यमंत्री खट्टर यांचे आभार मानले.

कोर्टाने रायन स्कूलची बाजू लढवणार नाही : बार असोसिएशन  
कोणताही वकील कोर्टात रायन स्कूलची बाजू लढवणार नाही, असा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. यापूर्वी बार असोसिएशनने हत्येचा आरोपी अशोक कुमारचं खटला न लढण्याचा निर्णय घेतला होता.